वैनगंगा घाटावर १२० ब्रास रेतीसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:24 AM2021-06-17T04:24:37+5:302021-06-17T04:24:37+5:30
तालुक्यातील टेंभरी-विहीरगाव येथील वैनगंगा नदीपात्रात तस्करांकडून रेतीचा अवैध उपसा करून साठेबाजी केली जात होती. ही रेती ट्रक - टिप्परच्या ...
तालुक्यातील टेंभरी-विहीरगाव येथील वैनगंगा नदीपात्रात तस्करांकडून रेतीचा अवैध उपसा करून साठेबाजी केली जात होती. ही रेती ट्रक - टिप्परच्या माध्यमातून बाहेर जिल्ह्यात पाठविली जात होती. यातून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. तसेच कोट्यवधींंचे गौण खनिजही चोरीस जात आहे. याबाबत लाखांदूर तहसीलदारांकडे तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारींची दखल घेत तहसीलदार अखिलभारत मेश्राम यांच्या नेतृत्वात नायब तहसीलदार देविदास पाथोडे, मंडळ अधिकारी खोब्रागडे, नागपुरे व तलाठी मेश्राम यांनी मंगळवारी टेंभरी विहीरगाव नदी घाट परिसरात धाड टाकली. नदी परिसरातून जवळपास १२० ब्रास रेतीसाठा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेला रेतीसाठा येथील पोलीस पाटील मार्कंड ढोरे यांच्या सुपूर्दनाम्यावर सोपविण्यात आला. जप्त साठा चोरीचा प्रयत्न करणाऱ्या तस्करांविरोधात थेट पोलीस कारवाई करण्याचे निर्देशदेखील देण्यात आले आहेत.
बॉक्स
मंदिर परिसरात सर्वाधिक रेतीसाठा
लाखांदूर तहसीलदारांनी टेंभरी येथे धाड टाकली तेव्हा नदीतीरावरील मंदिर परिसरात सर्वाधिक रेतीसाठा आढळून आला. तालुक्यातील एका तस्कराने स्थानिक गावकऱ्यांना आमिष देत राजरोसपणे मशीनद्वारे रेती उपसा केल्याची माहिती तहसीलदारांना गावकऱ्यांनी दिली. तर विहीरगाव चप्राड मार्गालगतचा रेतीसाठाही जप्त करण्यात आला. रेती तस्करांनी एका शेतकऱ्याच्या शेतीपयोगी साहित्याची नासधूस केल्याचा आरोपदेखील करण्यात आला आहे.
बॉक्स
रेती तस्करांविरोधात फौजदारी कारवाई करा
टेंभरी-विहीरगाव नदीघाट परिसरात ठिकठिकाणी आढळून आलेला अवैध रेतीसाठा काही शेतकऱ्यांच्या शेतातून जप्त करण्यात आला आहे. तालुक्यातील काही तस्करांनी हा साठा केल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. संबंधित तस्करांविरोधात शेतकरी व गावकऱ्यांचे जबाब नोंदवून तहसील प्रशासनाने फौजदारी कारवाई करण्याची मागणी होत आहे.
===Photopath===
160621\img20210615162720.jpg
===Caption===
टेंभरी नदीघाटालगत असलेला रेतीसाठा जप्त करतांना तहसिलदार अखिलभारत मेश्राम व अन्य कर्मचारी