अवैध रेती आणि दोन ट्रकसह १.२० कोटींचा माल जप्त; मोहाडीतील महसूल अधिकाऱ्यांनी रात्री घातली धाड
By गोपालकृष्ण मांडवकर | Published: February 17, 2024 06:40 PM2024-02-17T18:40:06+5:302024-02-17T18:40:30+5:30
वाहन चालकाने आपल्या लेखी बयाणात, दोन्ही ट्रक बपेरा (तहसील तुमसर) येथून विना रॉयल्टी रेती भरण्यात आल्याची कबुली दिली.
भंडारा: तुमसर तालुक्यातील बपेरा घाटावरून विना परवाना रेती वाहतूक करणाऱ्या दोन ट्रकवर परिविक्षाधिन उपविभागीय अधिकारी अनय नावंदर यांच्या पथकाने जप्तीची कारवाई केली. या कारवाईत रेतीसह दोन ट्रक मिळून १ कोटी २० लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला. आता हे दोन्ही ट्रक मोहाडी पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले आहेत.
१६ फेब्रुवारीच्या रात्री मोहाडीचे तहसीलदार सुरेश वाघचौरे यांच्या महसूल पथकातील नायब तहसीलदार सुखदेव चांदेवार, तलाठी संकेत बिरानवार, कोतवाल चंद्रकुमार नंदनवार, सुनील गायधने, दिनेश खंगार यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास दहेगाव येथील राज्य मार्गांवरील माया राईस मिलच्या समोर क्रमांक एम.एच.२७/बी.एक्स. ३८२३ आणि एम.एच. २७/बी.एक्स. ८३५६ या क्रमांकाचे दोन ट्रक थांबवून तपासणी केली. दरम्यान, वाहन चालकाकडे रेती वाहतूक परवाना नसल्याचे लक्षात आले. यामुळे दोन्ही ट्रकचा जप्तीनामा व पंचनामा करून रेती भरलेले ट्रक पोलिस स्टेशन मोहाडी येथे जमा करण्यात आले.
चालकाने दिली कबुली
वाहन चालकाने आपल्या लेखी बयाणात, दोन्ही ट्रक बपेरा (तहसील तुमसर) येथून विना रॉयल्टी रेती भरण्यात आल्याची कबुली दिली. या दोन्ही वाहनांवर प्रत्येकी ६ लाख १८ हजार रुपयांच्या महसुली दंडाची रक्कम आकारण्यात येणार असून, जवळपास १ कोटी २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तुमसरचे महसूल अधिकारी करतात काय ?
तुमसर तालुक्यातील बपेरा येथून रेतीची अवैध वाहतूक होत असताना मोहाडी तालुक्यातील महसूल पथकाद्वारे अनेक वेळा कारवाई केली. येथे कारवाई होत असताना तुमसरमधील महसूल व पोलिस पथक करतात तरी काय, असा प्रश्न आता विचारला जात आहे. तुमसरमधून अवैध वाहतूक होत असताना आतापर्यंत एकही कारवाई झाली नसल्यामुळे महसूल व पोलिस पथकाच्या कर्तव्यावर हे प्रश्नचिन्हच आहे.