ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांची 12 काेटी 75 लाख थकबाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:00 AM2021-09-02T05:00:00+5:302021-09-02T05:00:32+5:30
भंडारा जिल्ह्यात ५३७ ग्रामपंचायती असून त्याअंतर्गत ८९८ महसुली गावे आहेत. प्रत्येक गावात पथदिवे आहेत. वीज वितरणकडे या पथदिव्यांचे नाेंदणीकृत १२०० ग्राहक आहेत. त्यापैकी तब्बल १०९७ ग्राहक थकबाकीदार आहेत. तीन वर्षांपासून पथदिव्यांचे वीज बिल भरले नाही. त्यामुळे गत महिन्यांभरापासून वीज वितरणने धडक माेहीम हाती घेतली त्याअंतर्गत पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करणे सुरू केले आहे.
ज्ञानेश्वर मुंदे
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांचे वीज बिल कुणी भरावे यावरून वादविवाद सुरू असून थकीत वीज बिलापाेटी वीज वितरणने पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या १०९७ ग्राहकांकडे तीन वर्षांपासून १२ काेटी ७५ लाख रुपये थकीत आहे. वीज वितरणने गत आठवड्यात ५६ ग्रामपंचायतीच्या वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे गावांमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.
भंडारा जिल्ह्यात ५३७ ग्रामपंचायती असून त्याअंतर्गत ८९८ महसुली गावे आहेत. प्रत्येक गावात पथदिवे आहेत. वीज वितरणकडे या पथदिव्यांचे नाेंदणीकृत १२०० ग्राहक आहेत. त्यापैकी तब्बल १०९७ ग्राहक थकबाकीदार आहेत. तीन वर्षांपासून पथदिव्यांचे वीज बिल भरले नाही. त्यामुळे गत महिन्यांभरापासून वीज वितरणने धडक माेहीम हाती घेतली त्याअंतर्गत पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करणे सुरू केले आहे. जिल्ह्यातील १०९७ पथदिवे ग्राहकांकडे १२ काेटी ७५ लाख रुपये थकीत असून सर्वाधिक रक्कम भंडारा तालुक्यातील १९७ ग्राहकांकडे दाेन काेटी ७४ लाख रुपये आहे.
पूर्वी ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांचे वीज बिल शासन स्तरावर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भरले जात हाेते. त्यामुळे वीज बिलाची ग्रामपंचायतींना चिंता नव्हती. परंतु आता शासनाने हात वर केले असून ग्रामपंचायतींनाच पथदिव्याचे बिल भरावयाचे आहे. अनेक ग्रामपंचायतीकडे उत्पन्नाचे स्त्राेत नसल्याने पथदिव्यांचे वीज बिल थकीत राहिले. त्यातच आता वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित करणे सुरू केले. त्यामुळे पावसाळ्यात आणि सणासुदीच्या दिवसात गावांमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.
वीज खंडीत करण्याची माेहीम थांबविली
वीज वितरण कंपनीने गत आठवड्यात वीजपुरवठा खंडित करण्याची माेहीम हाती घेतली हाेती. मात्र आता ती काही काळासाठी थांबविण्यात आली आहे. एप्रिल २०२१ नंतर आलेले वीज बिल ग्रामपंचायतींना भरावयाचे आहे. मात्र त्यापूर्वीचे वीज बिल काेण भरणार यावर अद्याप एकवाक्यता झाली नाही. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्याची माेहीम थांबविल्याची माहिती आहे.
पाणीपुरवठा याेजनांकडे २ काेटी ७० लाख थकीत
जिल्ह्यातील ७६१ पाणीपुरवठा ग्राहकांपैकी तब्बल ५६२ पाणीपुरवठा याेजनांकडे वीज वितरण कंपनीचे दाेन काेटी ७० लाख रुपये थकीत आहेत. वसुलीसाठी वीज वितरण कंपनीने या सर्वांना नाेटीस बजावली आहे. ३९ पाणीपुरवठा याेजनांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
ग्रामपंचायतींनी थकबाकी तातडीने भरून अप्रिय कारवाई टाळावी, तूर्तास वीजपुरवठा खंडित करण्याची माेहीम स्थगित करण्यात आली आहे. मात्र लवकरच पुन्हा माेहीम हाती घेतली जाणार आहे. ग्रामपंचायतीकडे माेठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने कारवाई करण्याची वेळ आली.
- राजेश नाईक, अधीक्षक अभियंता,
वीज वितरण कंपनी भंडारा