130 गावांना पुराचा धोका; लाईफ गार्ड, लाईफ जॅकेटसह रबर बोट तयार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2022 05:00 AM2022-05-27T05:00:00+5:302022-05-27T05:00:25+5:30
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूर परिस्थितीसाठी संपूर्ण तयारी केली आहे. तालुकास्थळी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून ही यंत्रणा २४ तास अलर्ट राहणार आहे. तसेच प्रशिक्षण व बचाव साहित्याची चाचपणी करण्यासाठी प्रत्येक तालुकास्थळी माॅकड्रील घेतली जाणार आहे. संपूर्ण परिस्थितीवर जिल्हाधिकारी लक्ष ठेवून राहतील.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : दरवर्षी वैनगंगा, चुलबंद, सूर, कन्हान, बावनथडी नद्यांचा भंडारा जिल्ह्यातील तब्बल १३० गावांना पुराचा फटका बसतो. दोन वर्षापूर्वी आलेल्या महापुराच्या अनुभवातून आता प्रशासन सतर्क झाले असून आता आपत्ती व्यवस्थापन विभाग पूर परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी सज्ज झाले आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूर परिस्थितीसाठी संपूर्ण तयारी केली आहे. तालुकास्थळी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून ही यंत्रणा २४ तास अलर्ट राहणार आहे. तसेच प्रशिक्षण व बचाव साहित्याची चाचपणी करण्यासाठी प्रत्येक तालुकास्थळी माॅकड्रील घेतली जाणार आहे. संपूर्ण परिस्थितीवर जिल्हाधिकारी लक्ष ठेवून राहतील.
कोणत्या तालुक्यात किती गावांना पुराचा धोका?
तालुका धोका असलेली गावे
भंडारा २७
मोहाडी १७
तुमसर २४
पवनी ३३
साकोली ०३
लाखांदूर १८
लाखनी ०९
- बचाव पथकातील कर्मचारी लाईफ गार्ड यांना प्रत्येक तालुका ठिकाणी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
२५ बोट सज्ज, २५० लाईफ जॅकेट
- पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी २३ रबरी बोट, दोन फायबर बोट, २५० लाईफ जॅकेट आणि २०० लाईफ गार्ड सज्ज झाले आहे.
- उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक यांचे पथक पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास उपाययोजना करणार आहे.
या ठिकाणी येतो पूर
भंडारा तालुक्यातील करचखेडा, पिंडकेपार, पहेला, कारधा, भंडारा शहर, पवनी तालुक्यातील पवनाखुर्द, जुनोना, मांगली, तुमसर तालुक्यातील कर्कापूर, सुकळी, रेंगेपार, बपेरा, मोहाडी तालुक्यातील मुंढरी, कन्हाळगाव, करडी, लाखांदूर तालुक्यातील आवळी, मासळ, सोनी या गावांना दरवर्षी पुराचा फटका बसतो.
बचाव साहित्य वितरित
- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यावतीने शुक्रवारपासून बचाव साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे.
- पूरबाधित गावांना आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांचे पथक प्रत्येक पूरबाधित गावाला भेट देणार आहेत. जिल्हाधिकारी आकस्मिक भेट देणार आहे.
तालुका नियंत्रण कक्ष २४ तास अलर्ट
- सात तालुका ठिकाणी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून तेथे पाच कर्मचारी राहतील
- जिल्हा नियंत्रण कक्षातून सर्व सूचनांचे आदान-प्रदान पूरकाळात केले जाणार आहे.