विवाह सोहळ्यात १४ युगुलांचा ‘निकाह’
By admin | Published: May 26, 2015 12:40 AM2015-05-26T00:40:09+5:302015-05-26T00:40:09+5:30
वाढती महागाई यावर आळा बसावा व वेळ व पैशाची बचत व्हावी म्हणून मुस्लीम निकाह कमिटीने सामूहिक विवाह ....
सामूहिक विवाह सोहळा : मुस्लीम निकाह कमिटीचा उपक्रम
भंडारा : वाढती महागाई यावर आळा बसावा व वेळ व पैशाची बचत व्हावी म्हणून मुस्लीम निकाह कमिटीने सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होत. या सोहळ्यात मुस्लिम समाजातील १४ युगलांना विवाह बंधनात बांधण्यात आले. हा स्तुत्य सोहळा शहरातील मुस्लिम लायब्ररी येथे पार पडला.
भंडारा शहरात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मुस्लीम निकाह कमेटीच्या वतीने मागील ८ वर्षांपासून सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यावर्षीचा हा नववा सामूहिक विवाह सोहळा होता. या सोहळ्यासाठी मुस्लिम निकाह कमेटी तथा मुस्लिम लायब्ररीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन कार्यक्रमासाठी प्रयत्न केले.
यावर्षी मुस्लीम समाजातील १४ वधू-वरांचा निकाह करण्यासाठी नोंदणी करण्यात आली होती. मागीलवर्षी १२ जोडप्यांचे विवाह लावून देण्यात आले होते. परिणय बंधनात अडकलेल्या युगलांना कमेटीच्या वतीने वैवाहिक जीवनासाठी आवश्यक असलेल्या साहित्याची भेट देण्यात आली. त्यात पलंग, गादी, आलमारी, कपडे व भांड्यांचा समावेश आहे.
या सोहळ्यासाठी आलेल्या पाहुण्यांची जेवणाचा खर्चही कमेटीने उचलला. या सोहळ्यासाठी वधू-वरांकडून कुठल्याही प्रकारची आर्थिक मागणी करण्यात आली नव्हती. विवाह सोहळ्यासाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद कमेटीच्या ४५ सदस्यांनी प्रत्येकी एक हजार रूपये जमा करून केली व सोबतच शहरातील मान्यवरांकडूनही काही आर्थिक मदत घेण्यात आली. यशस्वीतेसाठी कमेटीचे अध्यक्ष सैय्यद सोहेल, फरहान खान, अरफात खान, अफसर खान, शकेबउद्दीन, खापीज खान, जुनेद खान, रिजवान काजी, अनिक जमा, तनविर खान, रिजवान खान, शेख शाबाद पाशा, अवेश खान, जुनेद खान, अमजद खान आदींनी प्रयत्न केले. (शहर प्रतिनिधी)