१४ दिवसांपासून दिव्यांग कुटुंबीयांचे उपोषण सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 09:59 PM2018-08-12T21:59:07+5:302018-08-12T21:59:27+5:30
शासन तथा प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता डोंगरी (बुज.) येथे मॉईल प्रशासनाच्या विरोधात दिव्यांग शेतकऱ्यांचे कुटुंब मागील १४ दिवसांपासून आमरण उपोषण करीत आहेत. परंतु जिल्हा प्रशासनाने अद्याप दखल घेतली नाही. मॉईलने शेती संपादीत केली. परंतु नोकरी दिली नाही, असा आरोप येथे शेतकरी कुटुंबियांनी केला आहे. दिव्यांग कुटुंबीयांकडे शासनाचे दुर्लक्ष दिसत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : शासन तथा प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता डोंगरी (बुज.) येथे मॉईल प्रशासनाच्या विरोधात दिव्यांग शेतकऱ्यांचे कुटुंब मागील १४ दिवसांपासून आमरण उपोषण करीत आहेत. परंतु जिल्हा प्रशासनाने अद्याप दखल घेतली नाही. मॉईलने शेती संपादीत केली. परंतु नोकरी दिली नाही, असा आरोप येथे शेतकरी कुटुंबियांनी केला आहे. दिव्यांग कुटुंबीयांकडे शासनाचे दुर्लक्ष दिसत आहे.
तुमसर तालुक्यात डोंगरी येथे मॅग्नीज ओर इंडिया लिमिटेडची खाण आहे. या खाणीत बाळापूर येथील विजय बर्वे यांची शेती मॉईल प्रशासनाने २० वर्षापूर्वी संपादीत केली होती. परंतु २० वर्षे लोटूनही नोकरी दिली नाही. त्याविरोधात दि.२८ जुलै पासून बर्वे कुटुंबिय डोंगरी खाणीसमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. आशिया खंडात क्रमांक एकची खाण म्हणून डोंगरी मॅग्नीज खाणीचा समावेश होतो. या परिसरातील हजारो एकर शेती मॉईलने संपादित केली व त्या मोबदल्यात नोकरी दिली. परंतु बाळापूर येथील विजय बर्वे यांच्या वडीलाच्या मालकीची शेती मॉईलने संपादीत केली. त्याचा आर्थिक मोबदला दिला. परंतु नियमानुसार कुुटुंबातील एका सदस्याला नोकरी दिली नाही. सध्या मॉईल प्रशासन नोकरी देण्यास टाळाटाळ करीत आहे. बर्वे कुटुंबियांची शेती गेल्याने त्यांच्यावर उपासमारीचे संकट ओढावले आहे. त्याविरोधात बर्वे कुटुंब चिमुकल्या मुलाबाळांसह भर पावसाळ्यात आमरण उपोषणावर दि.२८ जुलैपासून बसलेले आहेत. शिवसेनेने येथे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. बर्वे हे दिव्यांग असून भंडारा जिल्हा ग्रामपंचायत युनियनचे कार्याध्यक्ष रामलाल बिसने यांनी उपोषण मंडपाला भेट देवून आंदोलनाला समर्थन जाहीर केले आहे. उपोषण मंडपाला तहसीलदार गजेंद्र बालपांडे यांनी भेट देऊन मॉईलचे एजेंट राजेश भट्टाचार्य यांचेशी चर्चा केली. सदर विषय सोडविण्यात अडचणी असल्याचे त्यांनी तहसीलदार बालपांडे यांना सांगितले. यावेळी उपोषणकर्त्यांना उपोषणापासून परावृत्त करण्याच्या सूचना तहसीलदार बालपांडे यांनी दिल्या. येथे मॉईल प्रशासनाचे एजंट राजेश भट्टाचार्य यांनी बिसराज बर्वे यांची जमीन संपादित केली असून त्या गटावर नोकरी दिल्याची माहिती सांगत आहेत. तसे दस्ताऐवज त्यांनी तहसीलदार तथा इतर अधिकाºयांना दाखविले. या सर्व प्रमाणपत्राची येथे चौकशी करण्याची गरज आहे.
बर्वे कुटुंबियांची शेती संपादीत करण्यात आली. त्या गटावर नोकरी देण्यात आली आहे. सदर विषय सोडविण्यास अडचणी येत आहेत.
-राजेश भट्टाचार्य,
मॉईल एजंट, खाण प्रशासन डोंगरी