१३२ मचाणीवरून १४० प्राणिगणकांनी केली गणना
By admin | Published: May 14, 2017 12:21 AM2017-05-14T00:21:21+5:302017-05-14T00:21:21+5:30
नागझीरा अभयारण्यात बुद्ध पोर्णिमेच्या लख्ख प्रकाशात पाणवठ्यातील वन्य प्राण्यांच्या गणनेत नागझीरा-नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पात ....
पाच वाघांचे दर्शन : १० बिबट, हरीण, चितळ, अस्वल दिसले, पाणवठ्यावर प्राण्यांची हजेरी
शिवशंकर बावनकुळे । लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : नागझीरा अभयारण्यात बुद्ध पोर्णिमेच्या लख्ख प्रकाशात पाणवठ्यातील वन्य प्राण्यांच्या गणनेत नागझीरा-नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पात पाच वाघाचे तर १० बिबट्यांचे निसर्गप्रेमी प्राणिगणकांना दर्शन झाले त्याचप्रमाणे अन्यप्राणी पक्ष्यांचे दर्शन झाले.
प्रगणनेत बिबट्यांसह हरिण, चितळ, सांबर, अस्वल, निलगाय, रानकुत्रा, निलघोडे, रानगवे आदी वन्यप्राण्यासह मोर, लांडोर इतर पक्ष्याचेही दर्शन झाले. प्रगणकांना तीव्र उन्हाचा त्रास सहन करावा लागला. २४ तास गणनेत १३२ माचाणीवर १४० प्राणीगणकांनी ही गणना केली.
नागझीरा नवीन नागझिरा कोका, नवेगावपार्क, नवेगाव वाईल्ड लाईफ अशा वेगवेगळ्या १३२ माचाणीवर १४० प्राणीगणक उपस्थितीत झाले होते. अभयारण्यात पाणवठ्यावरील प्रगणना यशस्वीपणे पार पडली.
प्राणीगणनेत सहभागी झालेल्या अनेक प्रगणकांना वाघ, बिबट, हरिण, चितळ, सांबर, अस्वल, निलगाय, रानकुत्र्यांचे दर्शन झाले. पाणवठ्याशेजारच्या मचाणीवर प्रगणकांना बरेचदा व्याघ्रदर्शन झाल्याची माहिती प्रगणकांनी दिली. अभयारण्यात हिस्त्र प्राण्याबरोबर तृणभक्षक प्राण्याचे सर्वाधिक आवडीचे ठिकाण असल्याचे पुन्हा एकदा प्राणीगणनेत सिद्ध झाले. पोर्णिमेची रात्र प्रगणकांना सुखद अनुभूती देणारी ठरली. शहरातील धावपळीपासून दूर, शांत ठिकाणी एकाग्रतेने ध्यानमग्न होवून प्रगणकांबरोबर वनकर्मचारी वर्गाने वन्यप्राण्यांच्या हालचाली टिपल्या. विविध प्रकारच्या आवाजांनी रात्रीच्या वेळी चौकस राहण्याची भूमिका पार पाडली.