२५ हजार मतदार निवडणार १४१ ग्रामपंचायत सदस्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:28 AM2021-01-02T04:28:53+5:302021-01-02T04:28:53+5:30
राजू बांते मोहाडी : ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पुढील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकींचा हा ट्रेलर आहे. ...
राजू बांते
मोहाडी : ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पुढील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकींचा हा ट्रेलर आहे. गावातील ग्रामपंचायतीच्या सत्तेची चावी आपणाकडे राहावी यासाठी गावपुढाऱ्यांची लढाई सुरू झाली आहे.
मोहाडी तालुक्यात सतरा ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. ५२ प्रभागांतून १४१ सदस्यांना निवडून द्यायचं आहे. २५ हजार ११२ मतदारांच्या हातात १४१ सदस्यांचे भाग्य आहे. १४१ सदस्यांपैकी ७७ महिला सदस्य निवडून द्यायच्या आहेत. १७ ग्रामपंचायतींमध्ये १२ हजार ४०२ महिला मतदार व १२ हजार ७१० पुरुष मतदार आहेत.
ग्रामपंचायतीच्या निवडणुका कोविड-१९ मुळे पुढे ढकलल्या गेल्या होत्या. १७ ग्रामपंचायती प्रशासकांच्या हातात गेल्या होत्या. आता निवडणुकीचा गावात धुरळा उडणार आहे. यावर्षी गट ग्रामपंचायतीच्या निवडणुका ऐन संक्रांतीच्या मोसमात आल्यात. १४ जानेवारी रोजी संक्रांत आहे. १५ जानेवारीला मतदान केले जाणार आहे. या दोन दिवसांत वाण वाटण्याचा कार्यक्रम होईल. या वाणात उमेदवार महिला व पुरुष उमेदवारांच्या सौभाग्यवती महिलांच्या पदरात कोणतं वाण द्यायचे हे ठरवतीलच. यामुळे महिला मतदारांची संक्रांत नक्कीच गोड होणार आहे. मात्र, मतदान झाल्यानंतर कोणत्या महिला व पुरुष उमेदवारांची संक्रांत गोड - कडू होणार हे दिसणार आहे. तीळगूळ घ्या - गोडगोड बोला असं संक्रांत सणाला म्हटलं जाते. पण, मतदानानंतरच मतमोजणीच्या दिवशी पराजित झालेल्यांना तिळांच गोड लाडू चविष्ट वाटणार नाही.
मोहाडी तालुक्यातील या १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकींवर राजकीय पक्ष्यांच्या नेत्यांची बारीक नजर राहणार आहे. कारण या निवडणुका पुढील जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर पंचायतीच्या निवडणुकीवर प्रभाव पाडणार आहेत. सध्या आघाडीचे शासन आहे. त्यामुळे सगळ्यात जास्त ताण सत्ता पक्षातील नेत्यांना अधिक राहणार आहे. गावातील सत्ता पक्षात असणारे गावपुढारी व तालुक्यातील नेते यांच्यात किती समन्वय आहे यावर विजयाचे गणित ठरणार आहे. मोहाडी तालुक्यात विरोधी पक्षात विचार, गटांची दरी आहे; पण एक विरोधी गट प्रबळ आहे. याचा सामना सत्ता पक्षाचे तालुक्यातील नेते कसा करतात याचे चित्र पुढील पंधरवड्यात स्पष्ट होणार आहे.
गावपुढारी यांनी निवडणुकीची जबाबदारी आपल्या हातात घेतली; पण सरपंच पदाचे आरक्षण काढले गेले नाही. त्यामुळे काहीसा उत्साहात कमतरता असली. उत्सवात असणारी हीच उणीव परिणाम करणारी ठरणार आहे. सरपंच पदाचे आरक्षण काहीही येवो. त्यासाठी निवडणूक गांभीर्याने घेतली गेली, तसेच सर्व आयुधे वापर केला गेला, तरच सत्ता पक्ष असो की विरोधी पक्षाच्या नेत्यांना निवडणूक आपल्याकडे वळविता येणार आहे. यासाठी सत्ता पक्षातील नेत्यांची परीक्षा व प्रतिष्ठेची लढाई असणार आहे.
यावेळची निवडणूक सरपंच पदाची सस्पेन्स वाढविणारी आहे. सरपंच पदाची लॉटरी कुणाच्या नशिबात आहे हे निवडणुकीनंतर समजणार आहे. त्यामुळे सर्व उमेदवारही सदस्य पदाची निवडणूक मोठ्या ताकदीने लढणार आहेत.
बॉक्स
तीन गावांत महिला मतदार अधिक
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ५० टक्के महिलांचे पद आरक्षित आहेत; पण प्रत्यक्षात महिला सदस्यांचे आरक्षण ५४.६० टक्के आहे. १७ ग्रामपंचायतींमधील ग्रामपंचायत पिंपळगाव झंझाड, केसलवाडा लेंडेझरी व दहेगाव येथे महिलांचे मतदान पुरुषांपेक्षा अनुक्रमे १८, १ आणि ६ मतांनी अधिक आहे.