लाखोरी धान खरेदी केंद्रावर १४ हजार क्विंटल धान सडण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:39 AM2021-05-25T04:39:07+5:302021-05-25T04:39:07+5:30
लाखनी : उन्हाळी धान खरेदीसाठी तालुक्यात आधारभूत धान खरेदी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन होऊन प्रत्यक्षात धान खरेदीला ...
लाखनी : उन्हाळी धान खरेदीसाठी तालुक्यात आधारभूत धान खरेदी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन होऊन प्रत्यक्षात धान खरेदीला प्रारंभ झाला नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. खरीपपूर्व मशागतीला शेतकऱ्यांनी प्रारंभ केला असल्याने धान खरेदी केंद्र व शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार केला आहे. तालुक्यातील लाखोरी येथील दी जवाहर सहकारी भात गिरणी येथे उन्हाळी धान खरेदी केंद्राचे उद्घाटन झाले नाही. केंद्राजवळ धान ठेवायला जागा उपलब्ध नसल्याने आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे. मागील खरिपातील धान खरेदी ३१ मार्चपर्यंत सुरू होती. मागील खरिपात ३१ हजार क्विंटल धान खरेदी केली आहे. त्यापैकी १ हजार २०६ क्विंटल धानाची उचल झाली आहे. उर्वरित धानापैकी पाच गोदामे धानाने फुल भरली आहेत, तर १४ हजार क्विंटल धान आजही उघड्यावर पडून आहे.
लाखोरी धान खरेदी केंद्रावर लाखोरी, मासलमेटा, सिंगोरी (रिठी), चिखलाबोडी, रेंगेपार (कोठा), खेडेपार, ऐठेवाही (रिठी), बोरगाव, आलेसूर, पाऊलदौना (रिठी) येथील शेतकऱ्यांचे धान खरेदी केले जाते. परिसरातील १४८५ शेतकऱ्यांचे धान खरेदी केले जाते. लाखोरी केंद्रामार्फत ६ कोटी ९१ लक्ष ५९ हजार रुपयांचे धान खरेदी केले आहे.
राइस मिलच्या आवारात धानाची पोती उघड्यावर असून, अवकाळी पाऊस, वादळ वारा, गारपिटीमुळे धानाची पोती पावसाने भिजत असल्याने नुकसान होते आहे. खरेदी केंद्राद्वारे ताडपत्रीद्वारे धानाची पोती झाकण्यात येतात; परंतु ती अपुरी आहेत. काही प्रमाणात धान सडण्यास सुरुवात होत आहे. उन्हाळी धान खरेदी शासनाने सुरू केली असली तरी खरीप धानाची उचल झालेली नसल्याने नवीन धान ठेवायचे कुठे, हा प्रश्न खरेदी केंद्रापुढे आहे. पावसाच्या मोसमाला सुरुवात होणार अशावेळी धानाची पोती सांभाळण्याची कसरत खरेदी केंद्रात करावी लागणार आहे.
बॉक्स
पिंपळगाव येथे ६१ हजार क्विंटल धान खरेदी
तालुक्यातील पिंपळगाव (सडक) येथील धान खरेदी केंद्राला १८ गावे जोडली आहेत. दी पिंपळगाव सहकारी धान गिरणीमधील खरेदी केंद्राचे उद्घाटन झाले; परंतु धान खरेदीला प्रारंभ झाला नाही. मागील खरीप खरेदीअंतर्गत २४०६ शेतकऱ्यांचे ६१ हजार ६७९ क्विंटल धान खरेदी करण्यात आलेले आहे. त्यापैकी ६ हजार ५५३ क्विंटल धानाची उचल करण्यात आली आहे. ५५ हजार १२५ क्विंटल धान शिल्लक आहे. गोदामाच्या बाहेर उघड्यावर ४५ हजार क्विंटल धान पडलेले आहे. त्यावर ताडपत्री झाकलेली आहे. एकूण ११ कोटी ५२ लक्ष १४ हजार रुपयांचे धान खरेदी झाले आहे.
बॉक्स
धानाचा बोनस मिळालाच नाही
आधारभूत धान खरेदी केंद्रात विक्री केलेल्या खरीप धानाला १८६८ रुपये प्रतिक्विंटल हमी भाव देण्यात आला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना पैसे देण्यात आले; परंतु शेतकऱ्यांना अद्यापही धानाच्या बोनसची रक्कम अदा करण्यात आलेली नाही. शेतकरी खरीपपूर्व मशागतीला लागला आहे. रासायनिक खतांचे भाव वाढले आहेत. अशावेळी धान शेती करणे म्हणजे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणे आहे. खरीप धान शेतकरी अद्यापही बोनसच्या प्रतीक्षेत आहेत.