जिल्ह्यात अपघाताचे १४५ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 09:57 PM2018-12-15T21:57:27+5:302018-12-15T21:58:09+5:30

वाहतूक नियमांचे पालन न केल्याने वर्षभरात झालेल्या ३८९ अपघातात १४५ जणांनी आपला प्राण गमाविला. तर २१३ व्यक्ती गंभीर आणि २६० जण किरकोळ जखमी झाले. शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासह जिल्ह्यात विविध ठिकाणी अपघात झाले असून यात सर्वाधिक अपघात दुचाकीचे आहेत.

145 victims of an accident in the district | जिल्ह्यात अपघाताचे १४५ बळी

जिल्ह्यात अपघाताचे १४५ बळी

googlenewsNext
ठळक मुद्देवर्षभरात ३८९ अपघात : २१३ जण गंभीर तर २६० किरकोळ जखमी

ज्ञानेश्वर मुंदे।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : वाहतूक नियमांचे पालन न केल्याने वर्षभरात झालेल्या ३८९ अपघातात १४५ जणांनी आपला प्राण गमाविला. तर २१३ व्यक्ती गंभीर आणि २६० जण किरकोळ जखमी झाले. शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासह जिल्ह्यात विविध ठिकाणी अपघात झाले असून यात सर्वाधिक अपघात दुचाकीचे आहेत.
जिल्ह्यात जानेवारी ते १० डिसेंबर पर्यंत ३८९ अपघात झाले आहेत. या अपघातात १४५ जणांचा मृत्यू झाला. सर्वाधिक अपघात जानेवारी महिन्यात ४२ झाल्याची नोंद पोलीस दप्तरी आहे. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला असून ५५ जण जखमी झालेत. फेब्रुवारी महिन्यात २८ अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून ६० जण जखमी झाले. मार्च महिन्यात झालेल्या ३९ अपघातात १५ जण ठार झाले. तर ४४ जण जखमी झाले. एप्रिल महिन्यात झालेल्या ३३ अपघातात १५ जण ठार झाले. तर ५३ जण जखमी झाले. मे महिन्यात ४१ अपघात होऊन १७ जणांना आपला प्राण गमवावा लागला. या अपघातात ६१ जण जखमी झाले. जून महिन्यात ३७ अपघातात १६ जण ठार झाले. जुलै १०, आॅगस्टमध्ये नऊ, सप्टेंबर महिन्यात १६, आॅक्टोबर महिन्यात १२, नोव्हेंबर महिन्यात १६ आणि डिसेंबर महिन्याच्या १० तारखेपर्यंत १० अपघातात तीन जण ठार झाले. तर ११ जण गंभीर जखमी झाले.
देशभरात अपघातातील वाढती संख्या पाहता शासनाने त्यावर उपाययोजना केल्या नाही. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अल्पकालीन व दीर्घकालीन उपाय सूचविण्यासाठी रस्ता सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली. त्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. भंडारा जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी १ डिसेंबर पासून हेल्मेट सक्ती करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या मार्गदर्शनात जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण गाडे अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
अपघाताचे मुख्य कारण म्हणजे क्षमतेपेक्षा अधिक व्यक्तींची वाहतूक करणे, बेदरकारपणे वाहन चालविणे, मद्य प्राशन करून वाहन चालविणे, सीट बेल्टचा वापर न करणे, वेग मर्यादा न पाळता वेगाने वाहन चालविणे यामुळे अपघात होत आहेत. अनेकदा रस्ते नादुरुस्त असल्यामुळेही अपघात घडल्याच्या घटना आहेत. तसेच रात्रीच्या वेळी रस्त्यावर नादुरुस्त वाहन उभे असल्यास त्यावर दुसरे वाहन आदळून अपघात होतात. जिल्ह्यातील अपघाताची ही संख्या चिंतनीय असून वाहन चालकांनी वाहतूकीचे नियम पाळून वाहन चालविण्याची गरज आहे. अनियंत्रीत आणि बेशीस्त वाहतुकीचे बळी अनेक जण ठरतात. मरणाºया व्यक्तीच्या मागे त्याचे कुटुंबिय उघड्यावर पडते. त्यामुळे वाहन चालविताना नियंत्रीत आणि नियमानुसार वाहन चालविणे गरजेचे आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने अपघात वाढत आहेत.
अपघातात मदत करणाऱ्यांना त्रास होऊ नये
एखादा अपघात घडल्यास जखमीला रुग्णालयात पोहचविण्यासाठी अनेक जण टाळाटाळ करतात. त्यामागचे कारण म्हणजे पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा आणि कोर्टाच्या फेऱ्या ठरतात. मोटारवाहन अपघातातील प्रत्यक्षदर्शी आणि मदत करणाऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी आदेश काढले असून संबंधित सर्व ठाणेदारांना त्याबाबत कळविण्यात आले आहे. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांनाही याबाबत आवश्यक कारवाई करण्याची सूचना दिली आहे.

सर्वोच्च न्यायालय आणि रस्ता समितीच्या निर्देशानुसार विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. भंडारा शहरात हेल्मेट सक्ती करण्यात आली. जनजागृतीसोबतच दंडात्मक कारवाई केली जात आहे. उपाययोजनांना नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
-बाळकृष्ण गाडे, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा.

Web Title: 145 victims of an accident in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.