रस्ता अपघातात वर्षभरात १४६ जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 05:00 AM2020-02-25T05:00:00+5:302020-02-25T05:00:34+5:30

भंडारा जिल्ह्यातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गासह विविध राज्य आणि जिल्हा मार्गावर दररोज कुठे ना कुठे अपघात घडत आहेत. भंडारा शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग अपघातप्रवण स्थळ झाला आहे. जिल्ह्यातील अपघाताचे वाढते प्रमाण व त्याची नेमकी कारणे या विषयावर चर्चा केल्या जातात. अपघात झाला की प्रत्येक जण रस्त्याला दोष देऊन मोकळे होतात.

146 killed in road accident in year | रस्ता अपघातात वर्षभरात १४६ जणांचा बळी

रस्ता अपघातात वर्षभरात १४६ जणांचा बळी

Next
ठळक मुद्दे४०० वर गंभीर जखमी : सुसाट वेग, मोबाईलवर बोलणे आणि निष्काळजीपणा भोवतोय

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात वर्षभरात झालेल्या विविध वाहन अपघातात १४६ जणांचा बळी गेला तर तब्बल ४२० जण गंभीर जखमी झाले. सुसाट वेगाने वाहन चालविणे, नियमांचे उल्लंघन करणे आणि मोबाईलवर बोलणे ही या अपघातांची प्रमुख कारणे आहेत.
भंडारा जिल्ह्यातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गासह विविध राज्य आणि जिल्हा मार्गावर दररोज कुठे ना कुठे अपघात घडत आहेत. भंडारा शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग अपघातप्रवण स्थळ झाला आहे. जिल्ह्यातील अपघाताचे वाढते प्रमाण व त्याची नेमकी कारणे या विषयावर चर्चा केल्या जातात. अपघात झाला की प्रत्येक जण रस्त्याला दोष देऊन मोकळे होतात. परंतु वाहन चालविताना नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात नाही. जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर २०१९ या काळात ३९३ अपघाताची नोंद झाली आहे. त्यात १४६ जणांना आपला प्राण गमवावा लागला तर ४२० जण गंभीर जखमी झाल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे. त्यात १०३ जीवघेणे अपघात ठरले आहेत. गतवर्षीपेक्षा अपघाताच्या संख्येत घट दिसत असली तरी दररोज जिल्ह्यात कुठे ना कुठे अपघात घडत आहे.
वर्षभरात घडलेल्या विविध अपघातांच्या कारणांचा शोध घेतला तर बहुतांश ठिकाणी तीच ती कारणे आहेत. त्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन, विना परवाना वाहन चालविणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणे, सुसाट वेगाने वाहन चालविणे, निष्काळजीपणे ओव्हरटेक आणि महत्वाचे म्हणजे वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे होय. चारचाकी वाहनाच्या अपघातात सीटबेल्ट न लावणे हे ही महत्वाचे कारण आहे. भर रस्त्यात होणारे पार्कींग अपघात टाळण्यासाठी पुरेशा उपाययोजना अपघातास कारणीभूत ठरत आहे.
राष्ट्रीय महामार्ग जीवघेणा
भंडारा शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग जीवघेणा झाला आहे. मुजबी पासून शिंगोरीपर्यंत हा राष्ट्रीय महामार्ग दुपदरी आहे. भंडारा शहरासाठी बायपास नसल्याने सर्व अवजड वाहतूक याच मार्गावरून धावते. दिवसभर वाहतुकीची कोंडी होते. गत १५ दिवसापूर्वी रस्ता ओलांडणाऱ्या एका बारावीच्या विद्यार्थिनीला भिलेवाडा येथे ट्रकने चिरडले होते. या घटनेची शाई वाळत नाही तोच भिलेवाडा येथे नादुरुस्त चाक बदलविताना भरधाव कारने धडक दिल्याने भुसावळचे दोन भाऊ जागीच ठार झाले होते. तर गुरुवारी भरधाव कारने अ‍ॅक्टीवाला धडक दिल्याने बेला गावाजवळ मुलगा ठार तर वडील गंभीर जखमी झाले होते. भंडारा शहरातील खांबतलाव परिसरात रस्त्यावरील खड्ड्याने एका तरुणाचा बळी घेतला.
पालकांकडून समजदारीची अपेक्षा
अपघातानंतर अनेक कुटुंब उघड्यावर पडतात. डोक्यावरील आईवडीलांचे छत्र हरविले जाते. एकुलता एक मुलगा-मुलगी मृत्यूमुखी पडतो. कित्येकांना कायमचे अपंगत्व येते. हा प्रकार टाळण्यासाठी पालकांनी समजुतदारपणाची भूमिका घेणे गरजेचे आहे. अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन देऊ नये. परवाना असल्याशिवाय कुणालाही दुचाकी चालविण्यास देऊ नये. चारचाकी वाहन चालविताना सीटबेल्ट लावणे गरजेचे आहे. यासाठी पालकच महत्वाची भूमिका बजावू शकतात.
स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा
वाढते अपघात रोखण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग, जिल्हा वाहतूक शाखा, महामार्ग पोलीस उपाययोजना करते. रस्ता सुरक्षा सप्ताहही राबविला जातो. परंतु या उपाययोजना अगदी थिट्या पडतात. वाहतूक नियमांची प्रत्येकाला माहिती देण्यासाठी सामाजिक संस्थांनी शासकीय यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून जनजागृती करण्याची गरज आहे. शाळा महाविद्यालयात विद्याथ् र्यांना वाहतूक नियमांबाबत जागरुक करणे गरजेचे आहे. अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन देणार नाही अशी शपथ पालकांनी घेण्याची गरज आहे.
रिफ्लेक्टर लावण्याची गरज
रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला बैलगाडी, ट्रॅक्टर, ट्रक आदी वाहने उभी केली जातात. परंतु त्यांना रिफ्लेक्टर नसल्याने भरधाव वाहने धडकतात आणि अपघात होतात. यासाठी विविध वाहनांवर नि:शुल्क रिफ्लेक्टर (रेडीयम) लावण्याची मोहीम स्वयंसेवी संस्थांनी हाती घेणे गरजेचे आहे.


भंडारा जिल्ह्यात ३१ ‘ब्लॅक स्पॉट’
एकाच ठिकाणी वारंवार अपघात होणे, चारपेक्षा अधिक लोकांचा जीव जाणे अशा स्थळांना अपघातप्रवण स्थळ अथवा ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखले जाते. भंडारा जिल्ह्यात तब्बल ३१ ब्लॅक स्पॉट आहेत. त्यात राष्ट्रीय महामार्गावर भंडारा शहरात नागपूर नाका, फुलमोगरा पेट्रोलपंपाजवळ, खरबी फाटा (चिखली वळण रस्ता), शहापूर उड्डाणपुल वळण, कवडसी फाटा, फुलमोगरा, श्हापूर येथील एमआयईटी महाविद्यालयासमोरील रस्ता आणि पेट्रोलपंप ठाणा, भिलेवाडा, पलाडी फाटा, पिंपळगाव बसस्टॉप, गडेगाव वळण, लाखनी येथील तहसील चौक, मानेगाव सडक थांबा, सेंदूरवाफा तलाव चौक, साकोली येथील नागझिरा पॉइंट, साकोली बसस्थानक परिसर, बेला टी पॉइंट आदी स्थळांचा समावेश आहे. तर राज्यमार्गावर अड्याळ-नवेगाव बस थांबा, जांब पुल, दाभा फाटा, दवडीपार दरगा, मोहाडी बसस्थानक टी पॉइंट, आसगाव, पवनी येथील वैनगंगा नदीचा पुल, वाही - बेटाळा टी पॉइंट, खापा चौक तुमसर, निलज फाटा, वाही, बोरगाव, आंबाडी, टाकळी यासह साकोली तालुक्यातील किन्ही एकोडी फाटा ब्लॅक स्पॉट म्हणून पोलीस दप्तरी नोंद आहे.

Web Title: 146 killed in road accident in year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात