पाच वर्षांत ओटीपीच्या फंड्यातून सर्वसामान्यांना दीड कोटीचा गंडा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2021 01:07 PM2021-11-11T13:07:31+5:302021-11-11T13:18:56+5:30
भंडारा जिल्ह्यातून १५ लाख रुपयांनी अशी ऑनलाइन फसवणूक केली जाते. मागील पाच वर्षांत विविध घटनेत १ कोटी रुपयांनी फसवणूक झाल्याची माहिती आहे.
भंडारा : मेहनत न करता पैसे कमाविण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून फसवणूक होत असल्याचे प्रकार बघायला मिळत आहेत. विशेष म्हणजे, ओटीपीच्या माध्यमातून बँकेतून पैसे गायब होत असल्याचे प्रकार घडत आहेत. यात अनोळखी ॲप डाऊनलोड करताना ‘ऑटो रीड ओटीपी’ परमिशनची परवानगी घेतली जात आहे. यातूनच हे प्रकार घडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. वर्षाकाठी भंडारा जिल्ह्यातून १५ लाख रुपयांनी अशी ऑनलाइन फसवणूक केली जाते. मागील पाच वर्षांत १ कोटी रुपयांनी फसवणूक झाली आहे.
आतापर्यंत एखाद्या बँकेतून बोलत असून किंवा एटीएम ग्राहक सेवा केंद्रातून बोलत आहे, असे सांगून ग्राहकांना कॉल येत होता. त्यानंतर तुमचे एटीएम कार्ड बंद होणार, असे सांगून ते सुरू ठेवण्यासाठी ओटीपी विचारून खात्यातून पैसे काढले जायचे. मात्र, आता ही पद्धत बंद झाली आहे. आता डिजिटल युगात सॉफ्टवेअर ॲपच्या माध्यमातून बँकेतून सरळ रक्कम कपात करण्याचे प्रकार घडत आहेत.
गतवर्षी म्हणजे २०२० मध्ये फसवणुकीच्या ५० घटना घडल्या होत्या. त्यापूर्वी २०१९ मध्ये ३५ प्रकरणे, तर गत १० महिन्यांत सायबर माध्यमातून फसवणुकीचे जिल्ह्यात १९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशा प्रकरणात पैसे परत मिळण्याची शक्यता कमीच असते. अनेकदा फसवणूक करणारा इसम अनोळखी नंबरहून व प्रीपेड सीमकार्ड वापरून बोलायचा. दुसऱ्या वेळी तो नंबर लावल्यास तो नंबर ‘आउट ऑफ कव्हरेज एरिया’ किंवा ‘स्विच ऑफ’ असा दाखवितो. आताही तीच बाब घडत आहे. त्यामुळे पैसे एकदा गेले की, ते मिळणे कठीण आहे.
महिन्याकाठी तीन-चार गुन्हे
जिल्ह्यात दरवर्षी सर्वसाधारणपणे २४ लाख रुपयांची फसवणूक होत असल्याचे दिसून येत आहे. महिन्याकाठी तीन-चार गुन्हे घडतच असतात. जास्त रकमेने अनेकांची फसवणूक झाल्याचेही ऐकिवात आहे. परंतु, अनेकदा भीतीपोटी नागरिक समोर येत नाहीत. पोलीस यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे, नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.