कारधा चौफुलीवर १५ लाखांचा गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:35 AM2021-03-05T04:35:34+5:302021-03-05T04:35:34+5:30

भंडारा : धान भुशाच्या पोत्याआड होणारी गांजाची तस्करी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणली. भंडारा लगतच्या कारधा चौफुलीवर सीनेस्टाईल ...

15 lakh cannabis seized at Kardha Chaufuli | कारधा चौफुलीवर १५ लाखांचा गांजा जप्त

कारधा चौफुलीवर १५ लाखांचा गांजा जप्त

Next

भंडारा : धान भुशाच्या पोत्याआड होणारी गांजाची तस्करी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणली. भंडारा लगतच्या कारधा चौफुलीवर सीनेस्टाईल गुरुवारी कारवाई करीत तब्बल १४ लाख ८५ हजार ८४० रुपयांचा एक क्विंटल ४८ किलो गांजा जप्त करण्यात आला.

प्रीतसिंग बलवीरसिंग अरोरा, समीश संजू मेश्राम, प्रवीण नामदेव राऊत तिघेही राहणार नागपूर अशी गांजा तस्करांची नावे असून त्यांना अटक करण्यात आली आहे. एका ट्रकमधून गांजाची तस्करी होणार असल्याची टीप स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. हा ट्रक लाखनीवरुन भंडाराकडे जात असल्याचे माहित होताच पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांनी सापळा रचला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर नाकेबंदी करण्यात आली. हा ट्रक कारधा टोल नाका पास करुन पवनी फाट्यावर आढळून आला. ट्रक अडवून तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यात धान भुशाचे पोते आढळून आले. मात्र पोलिसांनी ट्रकमध्ये बघितले तेव्हा उग्र वास येत असल्याचे लक्षात आले.

या ट्रकमध्ये ११ पोतळ्यांमध्ये प्लास्टिकच्या पिशव्या ठेवल्याचे दिसून आले. पंचासमक्ष पोतळ्या उघडल्या असता त्यात ओलसर गांजा आढळून आला. इलेक्ट्राॅनिक काट्यावर वजन केले असता १४८ किलो ५८४ ग्राम गांजा आढळून आला. या गांजाची किंमत १४ लाख ८५ हजार ८४० रुपये असुन १५ लाख रुपये किमतीचा ट्रक आणि तीन महागडे मोबाईल जप्त करण्यात आले.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सुरेश मट्टामी, विवेक राऊत, हवालदार महाजन, शिवणकर, रवींद्र बोरकर, सतीश देशमुख, संदीप भानारकर, सचिन देशमुख यांनी केली. गांजा तस्करांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: 15 lakh cannabis seized at Kardha Chaufuli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.