१५ लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 10:43 PM2018-03-09T22:43:07+5:302018-03-09T22:43:07+5:30
लवारी व भावड येथे अवैधरित्या दारुची वाहतूक करणाऱ्या वाहनांचा सिनेस्टाईल पाठलाग करुन झाडाझडती घेतली असता मोठ्या प्रमाणात दारुसाठा मिळून आला.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : लवारी व भावड येथे अवैधरित्या दारुची वाहतूक करणाऱ्या वाहनांचा सिनेस्टाईल पाठलाग करुन झाडाझडती घेतली असता मोठ्या प्रमाणात दारुसाठा मिळून आला. यात ७५० मिलीच्या पाच पेट्या, १८० मिलीच्या १२ तर, ९० मिलीच्या ९८ पेट्या मिळून आल्या. दोन्ही गुन्ह्यातील मुद्देमालाची किंमत १४ लाख ९९ हजार ५६० रुपये असल्याचे सांगण्यात येते. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केली.
साकोली तालुक्यात अवैध दारुचा महापुर वाहत असल्याच्या तक्रारी पथकाला कळताच लवारी येथे पाळत ठेवण्यात आली. कार क्रमांक एम एच ३० ए ए ३४८४ असलेले वाहन पथकाने थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्या कार चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. या वाहनाचा पाठलाग करुन त्याला अडविण्यात आले. वाहनाची तपासणी केली असता १७ पेट्यांमध्ये देशी दारु, ६० सिलबंद बाटल्या व वाहन असा एकुण ४ लाख ९४ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी नरेंद्र सिताराम कोचे (३४) रा. साकोली, मेघराज हेंदाजी भोयर (३८) रा. सेंदुरवाफा यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुध्द महाराष्टÑ दारुबंदी कायद्यांतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
दुसरी कारवाई पवनी तालुक्यातील भावड येथे करण्यात आली. एम एच ३१ टी ए ८३१ या क्रमांकाच्या वाहनामध्ये अवैध दारुची वाहतुक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला कळली. त्यांनी ते वाहन अडविण्याचा प्रयत्न केला असता वाहनचालकाने वाहन थांबविले नाही. पथकाने पाठलाग करुन त्या वाहनाची झाडाझडती घेतली त्यात ९८ पेट्यांमध्ये देशी दारु ५० हजार व ९० मिलीच्या ९८०० सिलबंद बाटल्या मिळून आल्या. जप्त वाहनासह दारुसाठा १० लाख ४ हजार रुपयांचे असल्याचे पथकांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी चंद्रपूर जिल्ह्यातील अनिल अशोक कोवे (२३) रा. तळोधी बाळापुर याला अटक करण्यात आली आहे. पवनी तालुक्याला दारुबंदी असलेला चंद्रपूर जिल्ह्याची सिमा लागून असल्याने हा देशीदारुचा साठा चंद्रपूर जिल्ह्यात नेत असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.