जिल्ह्यात १५ नवीन शिवभोजन केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:27 AM2021-04-29T04:27:27+5:302021-04-29T04:27:27+5:30
भंडारा : कोरोना संचारबंदीच्या काळात हातावर आणून पानावर खाणाऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. दोन वेळच्या जेवणाचाही प्रश्न निर्माण झाला ...
भंडारा : कोरोना संचारबंदीच्या काळात हातावर आणून पानावर खाणाऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. दोन वेळच्या जेवणाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत शासनाने शिवभोजन योजनेतून निशुल्क थाळी देण्याचा निर्णय घेतला. आता पुन्हा राज्यात नवीन ३८ शिवभोजन केंद्राला मंजुरी देण्यात आली. त्यातील सर्वाधिक १५ केंद्र भंडारा जिल्ह्याला मिळाले. राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नामुळे गरजूंना १५०० अतिरिक्त शिवभोजन थाळ्यांचा लाभ मिळणार आहे.
राज्य शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने भंडारा जिल्ह्यासाठी १५ नवीन शिवभोजन केंद्रांना मान्यता दिली. जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी शासनाच्या १ जानेवारी २०२०च्या शासन निर्णय निकषाची पूर्तता करीत खात्री करूनच नवीन शिवभोजन केंद्र सुरू करण्यास मान्यता प्रदान केली.
जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रामध्ये पवनी शहरात कुणाल भोगे, अड्याळ येथे राहुल साम्रुतवार यांच्या शिवभोजन केंद्राला मान्यता देण्यात आली. लाखांदूर तालुक्यात भारतीय युवा बहुउद्देशीय संस्था बारव्हा तसेच मासळ या दोन ठिकाणी तर दीक्षा महिला बहुउद्देशीय संस्थेला लाखांदूर येथे मान्यता देण्यात आली. तुमसर तालुक्यात महिला बचत गट सरदार नगर आणि लुंबिनी महिला बचत गट मालवीय नगर, साकोली तालुक्यात दिशा महिला बहुउद्देशीय संस्थेला साकोली बसस्थानक तर आयुष संस्थेला एकोडी फाटा साकोली येथे मान्यता देण्यात आली. लाखनी तालुक्यात लाखनी येथे विजय चाचेरे, पोहरा येथे रोहित साखरे तर भंडारा तालुक्यात मोतीराम बहुउद्देशीय संस्थेचे राहुल निर्वाण, नवयुवक बहुउद्देशीय संस्था असे दोन शिवभोजन केंद्र असणार आहेत. मोहाडी तालुक्यात विजय पारधी यांचे मोहाडी शहरात व आंधळगाव येथे अनिल कोहाडे यांचे शिवभोजन केंद्र राहणार आहे.
खासदार प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नामुळे १५ केंद्र मंजूर झाले असून प्रत्येक केंद्रात १०० थाळ्यांची मान्यता असून यामुळे जिल्ह्यात १५०० अतिरिक्त शिवभोजन थाळ्या उपलब्ध होणार आहेत.