दारू विक्रेत्यासह १५ जणांना अटक
By Admin | Published: July 8, 2017 12:30 AM2017-07-08T00:30:03+5:302017-07-08T00:30:03+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महामार्गावरील अधिकृत दारू दुकाने बंद झाल्यामुळे दारू विक्रीच्या अवैध व्यवसायात वाढ झाली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचा छापा : १२ दुचाकी जप्त, शुक्रवारी वॉर्डात कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महामार्गावरील अधिकृत दारू दुकाने बंद झाल्यामुळे दारू विक्रीच्या अवैध व्यवसायात वाढ झाली आहे. भंडारा शहरातील शुक्रवारी परिसरात सुरू असलेल्या एका अवैध दारू विक्रीच्या दुकानात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा घातला. या कारवाईत १२ दुचाकी जप्त करून दारू विक्रेत्यासह १५ मद्यपींना अटक केली. ही कारवाई गुरूवारला रात्री करण्यात आली.
राजेश सुकाजी साकुरे (४५) रा.शुक्रवारी असे दारू विक्रीचे अवैध दुकान चालविणाऱ्याचे नाव आहे. त्याच्यासह त्याच्या दुकानात दारू पिणाऱ्या १४ जणांना पोलिसांनी अटक केली. या कारवाईत ३ लाख ३५ हजार रूपये किंमतीच्या १२ दुचाकी जप्त केले आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांना पांढराबोडी मार्गावरील राजेश साकुरे हा त्याच्या अंडे व चिवडा विक्रीच्या दुकानात देशी व विदेशी दारू विक्रीसह ग्राहकांना बसण्याची व्यवस्था करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. माहितीवरून घुसर यांनी गुरूवारला खातरजमा केली. माहिती खरी असल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या मार्गदर्शनात सुरेशकुमार घुसर यांनी पथकासह साकुरे यांच्या मालकीच्या दुकानात छापा घातला.
छाप्यादरम्यान साकुरे हा त्याचे दुकानात मद्यपींना बसवून अवैधरित्या हातभट्टी दारू व बिअर पुरविताना आढळून आला. पोलिसांच्या छाप्यामुळे मद्यपींना पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, गुन्हे शाखेतील पोलिसांच्या नियोजनानुसार पोलिसांनी दुकानदार साकुरे याच्यासह गिरी, मोगरे, मेश्राम, शुक्ला, भोयर, भारती, तलमले, साकुरे, शंभरकर, नंदूरकर, शेंडे, मदनकर, क्षिरसागर, सिंह या १४ मद्यपींना ताब्यात घेतले. या कारवाईत मद्यपींच्या १२ दुचाकी जप्त केल्या. या सर्वांविरूद्ध गुन्हा नोंदवून अटक केली.