पोहण्याचा मोह जीवावर बेतला; १५ वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2022 06:07 PM2022-08-06T18:07:47+5:302022-08-06T18:11:46+5:30
सोबत असलेल्या एका मित्राने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात यश आले नाही.
भंडारा : शेतात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या बालकाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना पवनी तालुक्यातील भुयार येथे शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. तलावात पोहण्याचा मोह त्याच्या जीवावर बेतला.
प्रज्वल राजु चुधरी (१५) रा. भुयार ता. पवनी असे मृताचे नाव आहे. तो गावातील विद्याकृषी विकास विद्यालयात ९ व्या वर्गात शिकत होता. शनिवारी सकाळची शाळा आटोपल्यानंतर तो आपल्या दोन मित्रांसह घरच्या शेळ्या घेऊन गाव तलावाकडे गेला. तलावातील पाणी पाहून त्याला पोहण्याचा मोह आवरता आला नाही. तो पोहण्यासाठी तलावात उतरला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडायला लागला. त्यावेळी त्याच्या सोबत असलेल्या एका मित्राने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात यश आले नाही.
या घटनेची माहिती गावात देण्यात आली. गावकऱ्यांनी तलावाकडे धाव घेतली. तलावात शोध सुरू झाला. मात्र काही वेळात प्रज्वलचा मृतदेहच हाती आला. या घटनेची माहिती पवनी पोलिसांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनाम केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पवनी येथे रवाना करण्यात आला. तपास पवनीचे पोलीस निरिक्षक दिलीप गढरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अनंता गारमोडे, अश्विन सतदेवे करीत आहेत. या घटनेने भुयार गावावर शोककळा पसरली आहे.