कन्हाळगाव परिसरातील १५० एकर शेतीला बॅकवाॅटरचा वेढा; शेतकरी अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2022 02:58 PM2022-02-02T14:58:31+5:302022-02-02T15:12:07+5:30
मोहाडी तालुक्यातील कान्हळगाव परिसरातील बेटावर असलेल्या १५० एकर शेतीला पाण्याचा वेढा पडला आहे. त्यामुळे शेती रस्ता बंद झाला असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
भंडारा : गोसे धरणाची पाण्याची पातळी वाढविण्यात आल्याने बॅकवाॅटरची मोठी समस्या निर्माण झाली असून, मोहाडी तालुक्यातील कान्हळगाव परिसरातील बेटावर असलेल्या १५० एकर शेतीला पाण्याचा वेढा पडला आहे. त्यामुळे शेती रस्ता बंद झाला असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या परिसरात पुलाचे बांधकाम करावे किंवा शेतीचे संपादन करून मोबदला द्यावा, अशी मागणी होत आहे.
वैनगंगा नदीत बेटाळा ते कान्हळगाव दरम्यान बेट आहे. बेट बेटाळा गावच्या हद्दीत मोडतो. मात्र, संपूर्ण शेती कान्हळगाव येथील शेतकऱ्यांची आहे. शेतात जाण्यासाठी कान्हळगाव फाटा वळण मार्गाने नदी पार करून प्रवास करावा लागतो. यापूर्वी जानेवारीनंतर नदीपात्र कोरडे पडत होते. मार्ग मोकळा राहात होता. परंतु सध्या गोसे धरणाची पाणी पातळी वाढल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
रब्बी हंगाम धोक्यात
सध्या शेतात रब्बी हंगामातील गवार, पोपटी, हरभरा, गहू आणि मोठ्या प्रमाणात भाजीपाला पीक आहे. परंतु शेतात बॅकवॉटर शिरल्याने पिकांचे नुकसान होत आहे. शेतीवर जाण्याचा मार्गही बंद झाला. शासनाने शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी शेतकरी अंतिराम कुकडे, जनार्धन भोयर, धनराज भोयर, आनंद भोयर, गंगाबाई भोयर, दादाराम भोयर, किशोर भोयर, महादेव भोयर, कवळू पंचबुध्दे, झिंगर पंचबुध्दे यांनी केली आहे.
बेटाळा - कान्हळगाव बेटावर जाण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. शेती पूर्णतः पाण्याने वेढली आहे. शेतीवर जाण्यासाठी पुलाचे बांधकाम करण्यात यावे, अथवा शासनाच्या वतीने भूसंपादन करून मोबदला द्यावा.
- दिगांबर कुकडे, सरपंच कान्हळगाव.
गोसेच्या बॅकवॉटरमुळे शेतीचे यापुढे नेहमी नुकसान होणार आहे. सध्या तर शेतात जाण्यासाठी रस्ताच नाही. त्यामुळे पीक कसे काढावे, हा प्रश्न आहे. त्यामुळे नदीवर पूल बांधावा किंवा भूसंपादन करून मोबदला देण्यात यावा.
- संजय भोयर, शेतकरी कान्हळगाव