फ्लावर समझे क्या... १५० किलो का ‘पुष्पा’ है मै!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2022 06:12 PM2022-04-01T18:12:42+5:302022-04-01T18:17:37+5:30
ज्याप्रमाणे ‘पुष्पा’ नामक सिनेमा प्रसिद्ध झाला, त्याचप्रमाणे भंडारा जिल्ह्यातील हा ‘पुष्पा’ बोकडही प्रसिद्ध झाला आहे. त्याच्या खरेदीसाठी चांदोरी गावात एकच झुंबड उडाली आहे.
साकोली (भंडारा) : शीर्षक वाचून अचंबित होऊ नका, कारण हा 'पुष्पा' खरच १५० किलो वजनाचा आहे. सध्या जिल्हाभरात त्याचीच चर्चा होतेय.
साकोली तालुक्यातील येथील चांदोरी येथे तब्बल दीडशे किलो वजन असलेल्या बोकडाचे नाव ‘पुष्पा’ आहे. चांदोरी ग्रामपंचायतीचे सदस्य देवा हातझाडे यांच्याकडे २५ महिने वयाचा पुष्पा नामक बोकड आहे. तब्बल दीडशे किलो वजनाचा हा बोकड ५ फूट उंच व पाच फूट लांब आहे. त्याला बघितल्यांवर भल्याभल्यांचा थरकाप उडतो.
या बोकडाची अंगकाठी बघता, जिल्ह्यात इतक्या मोठ्या वजनाचा तो एकमेव बोकड असल्याचे समजते. ज्याप्रमाणे ‘पुष्पा’ नामक सिनेमा प्रसिद्ध झाला, त्याचप्रमाणे भंडारा जिल्ह्यातील हा ‘पुष्पा’ बोकडही प्रसिद्ध झाला आहे. त्याच्या खरेदीसाठी चांदोरी गावात एकच झुंबड उडाली आहे.
‘पुष्पा’ खातो तरी काय?
याला रोज खायला कुडवाभर तांदूळ व कुडवाभर गहू लागतो. रोज फिरल्यानंतर मसाज केला जातो. पुष्पा जर घराबाहेर निघून रस्त्याने चालू लागला तर त्याची अंगकाठी पाहून चांगले-चांगले घाबरतात. त्याचा हा रुबाब पाहता, पुष्पा नामक साउथ चित्रपटाच्या अल्लू अर्जुनप्रमाणे त्याचाही दरारा पाहायला मिळत आहे.
आता त्याची चर्चा आता पंचक्रोशीत पसरली असून, हैदराबादच्या व्यापाऱ्यांची एकच झुंबड या पुष्पाला खरेदी करण्यासाठी चांदोरी गावात लागलेली आहे. ‘पुष्पा’चा तोरा बघता त्याच्या मालकाने त्याची किंमत २ लाख रुपये ठेवली आहे. व्यापाऱ्यांनी लावलेली बोली लक्षात घेता मालक देवा हातझाडे हे ‘झुकेगा नहीं’ म्हणत किंमत सोडायला तयार नाहीत !