वैनगंगेच्या बदलत्या प्रवाहाचा १५५ घरांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 01:03 AM2019-05-15T01:03:02+5:302019-05-15T01:03:28+5:30
जीवनदायीनी वैनगंगा नदीचा गत २० वर्षांपासून प्रवाह बदलत असून या बदलत्या प्रवाहाचा फटका तुमसर तालुक्यातील रेंगेपार येथील १५५ घरांना बसत आहे. वैनगंगा नदीने नदीतिरावरील अर्धा किमी परिसर गिळंकृत केला असून १५५ कुटुंबांचे पुनर्वसन शासनाने केले आहे. मात्र दोन कुटुंब अद्यापही भूखंडाच्या प्रतिक्षेत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : जीवनदायीनी वैनगंगा नदीचा गत २० वर्षांपासून प्रवाह बदलत असून या बदलत्या प्रवाहाचा फटका तुमसर तालुक्यातील रेंगेपार येथील १५५ घरांना बसत आहे. वैनगंगा नदीने नदीतिरावरील अर्धा किमी परिसर गिळंकृत केला असून १५५ कुटुंबांचे पुनर्वसन शासनाने केले आहे. मात्र दोन कुटुंब अद्यापही भूखंडाच्या प्रतिक्षेत आहेत.
तुमसर तालुक्यातील रेंगेपार हे गाव वैनगंगा नदीच्या तिरावर आहे. पूर्वी रेंगेपार नदीपात्रापासून एक ते सव्वा किमी दूर होते. मात्र गत वीस वर्षात वैनगंगेचा प्रवाह सतत गावाच्या दिशेने सरकत आहे. परिणामी अर्धा किमी परिसर वैनगंगेने आपल्या कवेत घेतला आहे. शासनाने नदीकाठावरील १५५ कुटुंबांची दखल घेतली. आतापर्यंत ८५ कुटुंबांना भूखंड दिले तर ७० ग्रामस्थांना घरकुल देण्यात आले. यासाठी स्थानिक ग्रामस्थांना शासनाशी मोठा संघर्ष करावा लागला. आंदोलने, मोर्चे, जलसमाधी घेऊन शासनाचे लक्ष वेधण्यात आले होते.
रेंगेपार येथील गुलाब लटारू कावळे व कलाबाई शेंडे यांना पुनर्वसनाचा लाभ मिळाला नाही. २० वर्षापूर्वी दोघांनी सदर योजनेचा लाभ घेतला होता. त्यामुळे त्यांना लाभ देता येणार नाही असे प्रशासन सांगत आहे. मात्र ग्रामस्थांनी पाठपुरावा केल्याने त्यांची नावे प्रतीक्षा यादीत आली आहेत. ही कुटुंब आजही नदीच्या तिरावर जीव मुठीत घेऊन वास्तव्याला आहेत.
रेती उपस्याचा परिणाम
तुमसर व तिरोडा तालुक्याच्या सीमेतून वैनगंगा नदी वाहते. दरवर्षी रेतीघाटाचा लिलाव केला जातो. तिरोडा सीमेत रेतीसाठा आहे. तर तुमसर तालुक्यात रेतीच्या उपस्याने पात्र खोल झाले आहे. पावसाळ्यात नदीचा प्रवाह तुमसर तालुक्याच्या हद्दीतून वाहतो. पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहाला मोठी गती असते. त्यामुळे नदी दुथडी खचत आहे. पाण्याचा प्रवाह वळविणे हाच एकमेव उपाय आहे.
रेंगेपार येथील नदीघाट अत्यंत धोकादायक झाला आहे. १५५ कुटुंबांना घर सोडून जावे लागले. दोन कुटुंब घरकुलाची प्रतीक्षा करीत आहेत. नदीकाठावरील रस्ता बंद झाल्यास गावाला नवीन बायपास रस्ता शासनाने मंजूर करावा.
-हिरालाल नागपुरे, पंचायत समिती सदस्य