१५८ गावात एनडीडीबीच्या पुढाकारातून ‘धवलक्रांती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 10:10 PM2018-01-08T22:10:43+5:302018-01-08T22:11:01+5:30

In 158 villages, 'Dhawal Kranti' from NDDB initiative | १५८ गावात एनडीडीबीच्या पुढाकारातून ‘धवलक्रांती’

१५८ गावात एनडीडीबीच्या पुढाकारातून ‘धवलक्रांती’

Next
ठळक मुद्देलोकमत शुभवर्तमान : जनावरांचा आहार संतुलन कार्यक्रम, ‘लॅपटॉप’धारक प्रतिनिधींची मदत

प्रशांत देसाई ।
आॅनलाईन लोकमत
भंडारा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक पध्दतीने दुध उत्पादन सुरू आहे. आता शास्त्रोक्त पध्दतीचा वापर करून दुध वाढीसाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाच्या (एनडीडीबी) योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात करण्यात येत आहे. यासाठी एनडीडीबीने भंडारा जिल्ह्यातील १५८ गावांची तीन वर्षासाठी निवड केली आहे. जिल्ह्यातील दुध उत्पादनात भरभराट व्हावी, यासाठी भंडारा जिल्हा दुग्ध संघाने पुढाकार घेतला आहे.
राष्टÑीय डेअरी विकास बोर्डाच्या योजनेतून ही संकल्पना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. दुधाचे उत्पादन वाढावे, यासाठी एनडीडीबीने जनावरांसाठी आहार संतुलन कार्यक्रम आखला आहे. विदर्भात दुध व्यवसाय आजही पारंपरिक पद्धतीने केला जातो. गाय व म्हशी पोषकतत्त्वांकरिता जंगलातील किंवा पडीक जमीनीवर चराई आणि ढेप, चुन्नीसारख्या कृषी उत्पादनावर अवलंबून आहेत. अपुऱ्या पोषकतत्त्वांची गरज मिश्रीत पशुखाद्यातून पूर्ण होऊ शकते. त्यामुळे जनावरांना संतुलीत पोषण आहार देण्यात येणार आहे. या माध्यमातून दुध उत्पादक जनावरांना पारंपरिक पध्दतीने दिला जाणारा चारा बंद करून आवश्यक तेवढ्याच खाद्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी शेतकºयांना ‘मेजरिंग टेप’ जिल्हा दुध उत्पादक संघाच्या माध्यमातून पुरवठा करण्यात येणार आहे. यामाध्यमातून भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक संघ जिल्ह्यातील गावागावात दुध व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करणार आहे.
लॅपटॉपधारक प्रतिनिधी जाणार घरोघरी
च्योजनेसाठी १५८ गावांमध्ये स्थानिय प्रशिक्षित प्रतिनिधींची (एलआरपी) मानधनावर निवड करण्यात येणार आहे. या प्रतिनिधींना १५ दिवसांचे निवासी प्रशिक्षण देऊन त्यांना ‘लॅपटॉप’ देण्यात येणार आहे. या लॅपटॉपवर जनावरांच्या आहार व दुध उत्पादनाच्या माहितीचीही नोंद राहणार आहे. या माध्यमातून हे प्रतिनिधी घरोघरी जावून शास्त्रोक्त माहिती शेतकऱ्याना देतील. या माध्यमातून दुध देणाऱ्या गायींची ओळख ‘बिल्ला’ लावून ते सॉफ्टवेअर प्र्रणालीत जोडण्यात येणार आहे.
तालुकानिहाय आकडेवारी
एनडीडीबीने निवड केलेल्या १५८ गावांची तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे - भंडारा ४२, लाखांदूर २०, लाखनी २१, मोहाडी २६, पवनी १८, साकोली २० आणि तुमसर तालुक्यातील ११ गावांचा समावेश आहे.
सबसिडीवर होणार खाद्याचा पुरवठा
या माध्यमातून शेतकऱ्यांना दुग्ध संघासोबत जोडण्यावर भर देण्यात येत आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना सबसिडीवर पशु औषधी, जनावरांचे खाद्य बाजारभावापेक्षा अल्प दरात पुरवठा करण्यात येणार आहे. जनावरांना देण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थाचा योग्य वापर व्हावा, यासाठी जनावरांच्या आवश्यक क्षमतेएवढाच खाद्य पुरवठा करण्याची ही योजना आहे. यामुळे कमी खर्चात संतुलित आहार, दुध उत्पादन, दुधातील फॅट आणि एस.एन.एफमध्ये वाढ होईल, जनावरांच्या प्रजनन क्षमतेत वाढ होईल.
एनडीडीबीने निकषातून निवडले गावे
२०११ च्या जनगणनेनुसार गावांची यादी भंडारा जिल्हा दुग्ध संघाने एनडीडीबीकडे पाठविली. यातील १०० लिटर व त्यापेक्षा अधिक दुध संकलन करणाऱ्या जिल्ह्यातील १५८ प्राथमिक दुग्ध उत्पादक सहकारी संघाची निवड एनडीडीबीने केली आहे. शेतकºयांना दुग्ध वाढीसाठी वेळोवेळी मार्गदर्शन मिळावे, यासाठी दोन तज्ज्ञ प्रशिक्षक व एक पशुवैद्यकिय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यांच्या माध्यमातून शेतकºयांना अद्ययावत माहिती देण्यात येणार आहे.

पारंपरिक पीक पद्धतीसह दूध उत्पादन वाढण्यासाठी एनडीडीबीचा हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना अत्याधुनिक माहिती देण्याचा दूध संघाचा प्रयत्न आहे. या योजनेतून जिल्ह्याची दूध उत्पादनाची क्षमता वाढीस मदत होईल.
- रामलाल चौधरी, अध्यक्ष, जिल्हा दुग्ध उत्पादक संघ भंडारा.

शेतकऱ्यांची दूध उत्पादनात रूची वाढावी यासाठी कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. नियोजित पध्दतीने जनावरांना खाद्यपुरवठा करण्यात येत असल्याने खर्चाची बचत होईल. यातून कमी खर्चात चांगल्या प्रतीचे दूध उत्पादनासाठी मदत होईल.
- करण रामटेके, कार्यकारी संचालक, दुग्ध उत्पादक संघ, भंडारा.

Web Title: In 158 villages, 'Dhawal Kranti' from NDDB initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.