५४१ गावांत १६२३ जलमित्र; आतापर्यंत नाममात्र अर्ज; मानधन मिळणार किती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 01:55 PM2024-10-08T13:55:22+5:302024-10-08T13:56:22+5:30
थेंब न् थेंब वाचविणार : ग्रामपंचायतीकडून माहिती मागविली
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या देखभालीसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीत तीन जलमित्रांची नेमणूक करण्यात येणार आहे, त्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत नाममात्र अर्ज आल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये जल जीवन मिशनचे काम सुरू आहे. काही गावांत योजना पूर्ण झाल्या आहेत तर काही गावांत कामे सध्या सुरू आहेत.
या पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद शासनाने केली आहे. मात्र या योजना भविष्यात व्यवस्थित सुरू ठेवण्यासाठी तसेच देखभाल दुरुस्तीकरिता प्रत्येक गावात तीन जलमित्रांची निवड करण्यात येणार आहे. नळ दुरुस्तीकरिता प्लंबर, मोटार दुरुस्ती करिता फिटर, सौर पंप व वीज पुरवठा सुरळीत होण्याकरिता वायरमन, इतर कामांच्या दुरुस्तीकरिता गवंडी अशाप्रकारे तांत्रिक कौशल्य असणारे तीन व्यक्तींची निवड ग्रामपंचायतीकडून होणार आहे. पूर्वी प्रशिक्षण घेतलेले व अनुभवी कारागीर ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध करणे तसेच त्यांना प्रशिक्षित करून पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी उपयोगात आणण्याचा उद्देश आहे.
मानधन किती?
ग्रामपंचायतींमध्ये नेमल्या जाणाऱ्या जलमित्रांना शासनाकडून मानधन मिळणार असल्याचे सांगण्यात येते. तर दुसरीकडे पाणीपुरवठा योजनेच्या गरजेनुसार करावयाच्या दुरुस्तीवेळी ठराविक रक्कम मिळणार असल्याचे सांगण्यात येते.
अर्ज आले किती?
भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना प्लंबर गवंडी कौशल्य ट्रेड संच-१, मोटार मेकॅनिक फिटर ट्रेड संच-२, इलेक्ट्रिशियन पंप ऑपरेटर संच-३ अशा प्रत्येकी संचामध्ये तीन सदस्यांची माहिती भरून एकूण नऊ सदस्यांची माहिती तत्काळ भरण्याचे कळविण्यात आले आहे. या माहितीची हार्ड कॉपी तालुकास्तरावर ठेऊन जिल्हा कार्यालयास माहिती भरल्याचे कळविण्याबाबत सूचना दिल्याचे समजते.
ग्रामपंचायतींकडून माहिती मागविणे सुरु
तालुका ग्रामपंचायती
भंडारा ९४
लाखांदूर ६४
लाखनी ७१
मोहाडी ७६
पवनी ७९
साकोली ६२
तुमसर ९७
एकूण ५४१
नेमणार १६२३ जलमित्र
अनेक गावांमध्ये जल जीवन मिशन पाणीपुरवठा योजनांचे कामे मंजूर झालेली आहे. त्यातील बरीच कामे पूर्ण होऊन पाणीपुरवठा योजना सुरू झाल्या आहेत. या योजनांच्या देखभाल दुरुस्तीसाठी करून देण्यासाठी शासनाची जलमित्र संकल्पना आहे. ग्रामपंचायतींमध्ये प्रत्येकी तीन जलमित्र प्रशिक्षित करणे शासनाचे उद्दिष्ट आहे.
काय करणार हे जलमित्र?
पाणीपुरवठाची देखभाल व दुरुस्तीची कामे जलमित्र करणार आहेत. ग्रामपंचायतीमध्ये गवंडी-प्लंबर, मेकॅनिक, फिटर व पंप ऑपरेटर, इलेक्ट्रिशियन जलमित्र नेमले जात आहेत.