रेती प्रकरणी १.६६ लाखांचा दंड
By admin | Published: April 18, 2017 12:35 AM2017-04-18T00:35:10+5:302017-04-18T00:35:10+5:30
रेती चोरण्याच्या उद्देशाने रेतीघाटावर जमा झालेल्या १६ ट्रॅक्टरवर सुटीच्या दिवशी १४ एप्रिलच्या मध्यरात्री....
तहसीलदारांची कारवाई : प्रकरण मोहाडी तालुक्यातील
मोहाडी : रेती चोरण्याच्या उद्देशाने रेतीघाटावर जमा झालेल्या १६ ट्रॅक्टरवर सुटीच्या दिवशी १४ एप्रिलच्या मध्यरात्री तहसीलदार धनंजय देशमुख यांनी पोलिसांच्या मदतीने कारवाई करून ते ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात जमा केले होते. ट्रॅक्टर रिकामे आढळल्यामुळे त्यांच्यावर कोणती कारवाई करावी याचे वरिष्ठाकडून मार्गदर्शन घेतल्यावर प्रति ट्रॅक्टर १० हजार ४०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याने ट्रॅक्टर मालकांचे धाबे दणाणले आहे.
गुप्त माहितीच्या आधारे मोहाडीचे तहसीलदार धनंजय देशमुख यांनी नायब तहसीलदार डॉ.गौरीशंकर चव्हाण, नायब तहसीलदार राहुल वाघ, लिपीक एकनाथ कातखेडे तसेच पोलीस निरीक्षक प्रदिपसिंह परदेशी, पोलीस नायक आशिष तिवाडे, होमगार्ड यशवंत ठवकर, दिपक ठवकर, रवी पाटील, सेलोकर यांच्या पथकाच्या सहाय्याने बेटाळा घाटावरील किनाऱ्यावर १६ ट्रॅक्टर रिकाम्या स्थितीत उभे असलेले आढळले. रात्रीच्या वेळी घाटावर ट्रॅक्टर उभे असल्याने संशयाच्या आधारे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. मात्र या सर्व ट्रॅक्टरचे चालक पळून जाण्यात यशस्वी झाले. खासगी चालक बोलावून हे सर्व ट्रॅक्टर मोहाडी पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले.
अजून पर्यंत या ट्रॅक्टरचे मालक तहसील कार्यालयात आलेले नाहीत. बेटाळा येथून वाहणाऱ्या वैनगंगा नदीवर दोन घाट आहेत. यापैकी एका रेती घाटाचा लिलाव झालेला असून दुसऱ्या रेतीघाटाचा लिलाव झालेला नाही. ज्या रेतीघाटाचा लिलाव झालेला आहे तेथून मोठ्या प्रमाणात उपसा झाल्याने त्या रेती घाटावर पुरेशी रेती नसल्याने लिलाव झाला नसलेल्या रेतीघाटाची रेती लिलाव झालेल्या घाटात ट्रॅक्टरच्या सहाय्याने आणली जाते अशी चर्चा आहे. या घटावरून त्या घाटात रेती सोडण्याची कारवाई संपूर्ण रात्रभर चालते. विशेष करून शासकीय सुटीच्या रात्रीच्या ४० ते ५० ट्रॅक्टर लावून कार्य केले जाते. अशी माहिती आहे. (शहर प्रतिनिधी)
टिप्परवर १ लक्ष चार हजारांचा दंड
मोहाडी तालुक्यातून रेती चोरण्याचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. रविवारच्या रात्री सातोना रस्त्यावरून विनापरवाना रेती वाहून नेणाऱ्या दोन टिप्पर ट्रकना जप्त करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. टिप्पर क्र.एम.एच. ३६ एफ ३४६२ हा रमेश डोळस वरठी यांच्या मालकीचा तर एम.एच. ४० एन ०९६५ हा टिप्पर ट्रक राजेश साठवणे यांच्या मालकीचा आहे. प्रत्येक टिप्परवर ५२ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. दोन्ही ट्रकवर एकुण १ लक्ष ४ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
पहाटे रेती चोरी
वैनगंगा नदीपात्रातून पहाटे ३ ते ५ वाजेच्या दरम्यान ट्रॅक्टरद्वारे मोठ्या प्रमाणात रेती चोरी करून वाहतूक केली जाते. पहाटेला रोहा, बेटाळा घाटातून कुशारी मार्गे डोंगरगाव, आंधळगाव मार्गे दहा ते १५ ट्रॅक्टर दररोज रेती वाहून नेत असल्याची विश्वासनीय माहिती आहे. मात्र या रेती माफीयावर अजूनपर्यंत तरी कारवाई करण्यात आलेली नाही. यामागे मोठे गौडबंगाल असल्याचे बोलले जाते.
शासकीय सुटीच्या दिवशी तसेच रात्रीला रेती चोरी होते अशी माहिती मिळाल्याने रेती चोरावर कारवाई करून दंडात्मक कारवाई करण्यात येऊन लक्षावधी रुपयाचा महसूल प्राप्त झाला.
-धनंजय देशमुख,
तहसीलदार, मोहाडी.