४३६ पैकी १७२ पदे रिक्त; कसा होणार शेतीची विकास ?

By युवराज गोमास | Published: July 20, 2024 03:21 PM2024-07-20T15:21:40+5:302024-07-20T15:22:19+5:30

कृषी विभाग : रिक्त पदांमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामांचा ताण

172 out of 436 posts vacant; How will agriculture develop? | ४३६ पैकी १७२ पदे रिक्त; कसा होणार शेतीची विकास ?

172 out of 436 posts vacant; How will agriculture develop?

युवराज गोमासे
लोकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : भंडारा कृषिप्रधान जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात उद्योग व व्यापारापेक्षा सर्वाधिक रोजगार निर्मिती कृषी क्षेत्रातून होते. परंतु, जिल्ह्यात कृषीच्या पायाभूत विकासाचे मार्गदर्शन व आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणाऱ्या कृषी विभागात रिक्त पदांचा ताण अनेक वर्षांपासून कायम आहे. जिल्ह्यात कृषी अधीक्षक कार्यालयांतर्गत एकूण ४३६ अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी २६४ पदे भरलेली असून, १७२ पदे रिक्त आहेत. त्यामुळे शेती व शेतकऱ्यांची प्रगती होण्यास अडथळे येत आहेत.


शेतकऱ्यांना कीटकनाशकांच्या विघातक दुष्परिणामाची माहिती नसते. त्याचा फटका अनेकदा बसतो. प्रसंगी शेतकऱ्यांचा जीवही जातो. जिल्ह्यात आधुनिक कृषी तंत्र. यंत्र, पीक लागवडीची, तसेच शास्त्रशुद्ध पद्धतीच्या माहिती अनेकांना नसल्याने उत्पादनात वाढ झालेली नाही. कृषी विभागाच्या योजनांपासून शेतकरी अनभिन्न आहे. पारंपरिक पद्धतीनेच शेती होताना दिसत आहे. यात बदल घडवून आणण्याची क्षमता कृषी विभागात आहे.


गट 'अ' दर्जाची ५ पैकी ३ पदे रिक्त
जिल्ह्यात कृषी उपसंचालकाचे पद रिक्त आहे. उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांची दोन पदे मंजूर असताना केवळ एक पद भरलेले असून, एक रिक्त आहे. पदभार सोपवून दिवस ढकलण्याचे काम होताना दिसत आहेत.

गट 'क' श्रेणीतील ३१८ पैकी १०७ पदे रिक्त
जिल्ह्यात गट 'क' श्रेणी तरी कर्मचाऱ्यांची ३१८ पदांना मान्यता आहे. त्यापैकी २११ पदे भरलेली असून, १०७ पदे रिक्त आहेत. यात कृषी सहायक, अनुरेखक, वाहन चालक व कनिष्ठ लिपिकांची सर्वाधिक पदे रिक्त आहेत. कृषी सहायकांची ४८, तर कृषी पर्यवेक्षकांची पाच पदे रिक्त आहेत.


गट 'ब' अधिकाऱ्यांची १५ पदे रिक्त
शासनाच्या योजना व नव तंत्रज्ञानाची माहिती पोहोचविण्याची महत्त्वाची जबाबदारी गट 'ब' अधिकाऱ्यांची असते. जिल्ह्यात गट ब अधिकाऱ्यांची ४२ पदे मंजूर आहेत. त्यापैकी २७ पदे भरलेली असून, १५ पदे रिक्त आहेत. जिल्ह्यात सात तालुका कृषी अधिकाऱ्यांपैकी एक पद भरलेले असून, सहा पदे रिक्त आहेत.


गट 'ड' श्रेणीतील ४७ पदांची कमतरता
विभागाच्या तळ पातळीवर थेट काम करणाऱ्या गट 'ड' कर्मचाऱ्यांची ७० पदे मंजूर असताना केवळ २३ पदे भरलेली असून, ४७ पदे रिक्त आहेत. यामुळे कामांचा खोळंबा होत आहे.


"कृषी विभागात रिक्त पदांमुळे कामांचा ताण वाढत असला तरी प्रभार सोपवून कामे निकाली काढली जातात. शेती व शेतकऱ्यांची प्रगती साधण्याकडे कृषी विभागाचे विशेष लक्ष आहे."
- संगिता माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, भंडारा.

Web Title: 172 out of 436 posts vacant; How will agriculture develop?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.