१.७७ लाख हेक्टरमध्ये होणार धान लागवड
By admin | Published: June 3, 2015 12:48 AM2015-06-03T00:48:07+5:302015-06-03T00:48:07+5:30
येत्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे. पीक लागवडीच्या दृष्टीने मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी ...
भंडारा : येत्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे. पीक लागवडीच्या दृष्टीने मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावर्षी सर्वसाधारण क्षेत्रापैकी १ लाख ७७ हजार २९३ हेक्टर क्षेत्र भात पिकाखाली येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून जिल्ह्यासाठी ६७ हजार ३०० मेट्रिक टन खतांचा साठा मंजूर करण्यात आला आहे.
भाताचे कोठार म्हणून सर्वश्रूत असलेल्या भंडारा जिल्ह्यात मागील वर्षी निसर्गाने साथ न दिल्याने भात उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. वरूणराजाने दडी मारल्याने अनेकांची पऱ्हे करपून तर काहींनी रोवणी पाण्याअभावी हातून गेली. त्यामुळे मागील वर्षीच्या खरीप हंगामात अनेकांच्या शेतीत धानाचे उत्पादन झाले नसल्याने शेती पडीक राहली.
जिल्हा परिषद कृषी विभाग व जिल्हा अधिक्षक कृषी विभागाच्या वतीने दरवर्षी खरीप व रब्बी पिकांचा अहवाल शासनाकडे सादर करतो. यावर्षी जिल्हा परिषद कृषी विभागाच्या अहवालानुसार, जिल्ह्यातील सर्वसाधारण क्षेत्रापैकी १ लाख ७७ हजार २९३ हेक्टर क्षेत्रात भात पिकाची लागवड करण्यात येणार आहे.
त्यासोबतच तूर, सोयाबीन, ऊस व अन्य पिकांची लागवड करण्यात येणार आहे. तूर पिकाची ८ हजार २५४ हेक्टर क्षेत्रात लागवड होणार असून सोयाबीनची ८ हजार ३३० क्षेत्रात लागवड होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मागील वर्षी निसर्गाने दगा दिल्याने शेतकरी हवालदिल झाला. यावर मात करता यावी, म्हणून खरीप हंगामात अनेकांनी भात पिकांऐवजी नगदी पीक म्हणून ऊस पिकाची लागवड करण्याचे ठरविले आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी ऊस पीक सुमारे ४ हजार हेक्टरमध्ये वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भात पिकासाठी ३८ हजार ५८६ क्ंिवटल बियाणांची गरज असून महाबीजकडे १३ हजार ५०० क्ंिवटल बियाणांची मागणी करण्यात आली आहे. तूर पिकासाठी ४५० क्ंिवटलची आवश्यकता असून महाबीजकडे २७० क्ंिवटलची मागणी करण्यात आली आहे. सोयाबीनची ८ हजार ३३० हेक्टरमध्ये पेरणी होणार असून त्यासाठी ५ हजार ४७२ क्ंिवटलची आवश्यक असून त्यापैकी ३ हजार २८२ क्ंिवटल बियाणांची महाबीजकडे मागणी केली आहे. (शहर प्रतिनिधी)
खताच्या लिंकिंग रोखण्यावर भर
जिल्ह्यात खताची लिंकिंग तसेच परप्रांतात खताची विक्री होणार नाही, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृषिनिविष्ठा संनियंत्रण स्थापन करण्यात आली आहे. जिल्ह्यातील खते, बियाणे निरीक्षकांनी सर्व कृषी सेवा केंद्रांची तपासणी जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. भरारी पथक व पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून कारवाई करण्यात येणार आहे.