एसटीतील १७८ जणांनी पगारवाढ स्वीकारली; १२५६ जणांनी नाकारली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2021 05:00 AM2021-12-03T05:00:00+5:302021-12-03T05:00:50+5:30
भंडारा विभागात भंडारा, गोंदिया, साकोली, तुमसर, तिरोडा, पवनी या सहा आगारांचा समावेश आहे. आगार स्तरावर चालक, वाहक, तांत्रिक आणि प्रशासकीय असे १४४३ कर्मचारी कार्यरत आहेत. महिनाभरापासून कर्मचारी संपावर कायम आहेत. त्यापैकी १७८ कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग नोंदविला नाही. परंतु, या तुटपुंज्या कर्मचाऱ्यांवर बससेवा सुरू करणे अडचणीचे जात आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा सुटायचे नाव घेत नाही. शहरी आणि ग्रामीण प्रवासी यामुळे त्रस्त झाले आहेत. अशातच शासनाने वेतनवाढ घोषित केली, तरी कर्मचारी मात्र संपावर कायम आहेत. भंडारा विभागातील १७८ जणांनी पगारवाढ स्वीकारली असून ते कामावर हजर आहेत. तर १२६५ कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.
भंडारा विभागात भंडारा, गोंदिया, साकोली, तुमसर, तिरोडा, पवनी या सहा आगारांचा समावेश आहे. आगार स्तरावर चालक, वाहक, तांत्रिक आणि प्रशासकीय असे १४४३ कर्मचारी कार्यरत आहेत. महिनाभरापासून कर्मचारी संपावर कायम आहेत. त्यापैकी १७८ कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग नोंदविला नाही. परंतु, या तुटपुंज्या कर्मचाऱ्यांवर बससेवा सुरू करणे अडचणीचे जात आहे. गत तीन दिवसांपासून केवळ साकोली आगारातून दोन बसफेऱ्या भंडारासाठी निघत आहेत. इतर आगाराच्या बसेस ठप्प आहेत. शहरी आणि ग्रामीण भागातील प्रवाशांना बाहेरगावी जाताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
खासगी गाड्यांची सवय झाली
महिनाभरापासून एसटीचा संप आहे. बाहेरगावी जायचे म्हटले तर मोठा प्रश्न आहे. परंतु आता खासगी गाड्या मिळतात. दोन पैसे जास्त द्यावे लागत आहेत. परंतु, आता खासगी गाड्यांशिवाय पर्याय नाही. महामंडळाने तत्काळ संप मागे घ्यावा. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. खासगी वाहनात अपघाताची भीती कायम असते. संप कधी मिटणार हा प्रश्न आहे.
-महेश कुंभारे, प्रवासी
एसटी सेवा बंद असल्याने आमचा शेतमाल शहरापर्यंत नेणे अडचणीचे जात आहे. अनेकदा शेतात पिकलेला भाजीपाला आम्ही बसद्वारे भंडारापर्यंत पाठवित होतो. आता खासगी वाहनात भाजीपाला पाठवावा लागतो. परंतु खासगी वाहनधारक पैसेही अधिक घेतात आणि अनेकदा नकार देतात. एसटीचा संप लवकर मिटल्यास सर्वांना दिलासा मिळेल.
-धनराज कायते, टेकेपार
प्रवाशांची आणि विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांनी आता सामोपचाराची भूमिका घ्यायला हवी. महिनाभरापासून बससेवा बंद आहे. महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. आधीच घाट्यात असलेली एसटी यामुळे आणखी रसातळाला जाईल. कर्मचाऱ्यांनी प्रवाशांच्या सोयीसाठी कामावर हजर व्हावे. आपल्या न्याय हक्कासाठी लढा दिलाच पाहिजे. परंतु प्रवाशांची गैरसोयही टाळणे तेवढेच महत्त्वाचे आहे.
-डाॅ.चंद्रकांत वडस्कर, विभागीय वाहतूक नियंत्रक
१९८ कर्मचारी निलंबित
- भंडारा विभागातील १९८ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले तर रोजंदारी ८६ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती केली आहे.