१.८९ लाख हेक्टर क्षेत्रात होणार खरिपाची लागवड
By admin | Published: June 6, 2017 12:18 AM2017-06-06T00:18:33+5:302017-06-06T00:18:33+5:30
सलग चार वर्षांच्या दुष्काळानंतर गतवर्षी समाधानकारक पाऊस राहिला. यंदा सरसरी इतका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
खरिपपूर्व मशागतींना वेग : ४,७०० हेक्टरने क्षेत्रवाढ
देवानंद नंदेश्वर । लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सलग चार वर्षांच्या दुष्काळानंतर गतवर्षी समाधानकारक पाऊस राहिला. यंदा सरसरी इतका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यावर्षी खरिप हंगामात ४ हजार ७०० हेक्टरने क्षेत्रवाढ होणार असून एक लाख ८९ हजार १०० हेक्टरमध्ये खरिपाचे पेरणीक्षेत्र प्रस्तावित केले. त्यानुसार बियाणे व खतांचे नियोजन केले आहे.
गतवर्षी एकुण एक लाख ८४ हजार ४०० हेक्टरमध्ये खरीपाची लागवड करण्यात आली होती. यात १ लाख ७३ हजार हेक्टरमध्ये धान पिक, ११३ हेक्टरमध्ये तुर, १ हेक्टरमध्ये मुग पिकाची लागवड करण्यात आली होती.
यावर्षीच्या खरीप हंगामात १ लाख ७६ हजार हेक्टरमध्ये धान पिकाची लागवड करण्याचे नियोजन आहे. त्याचप्रमाणे १३० हेक्टरमध्ये तुर आणि मुग पिकाची लागवडीचे प्रस्ताविक नियोजन करण्यात आले आहे.
धान बियाणांची ३८,८७० क्विंटलची मागणी
यावर्षी भात लागवडीसाठी महाबिज बियाण्याची १४ हजार ७० क्विंटल व खासगी बियाण्याची २४ हजार ८०० क्विंटल असे एकूण ३८ हजार ८७० क्विंटल बियाण्याची मागणी नोंदविण्यात आली आहे. यासह तुर बियाण्याची ७००, सोयाबिन ५६५ क्विंटल बियाण्याची मागणी केली आहे. गतवर्षी भात लागवडीसाठी एकूण ३३ हजार २०० क्विंटल बियाण्याची मागणी नोंदविण्यात आली होती. त्यापैकी ३० हजार ५३१ क्विंटल भात बियाण्यांचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले होते.
उन्नत शेती-समृद्ध शेतकरी तत्त्वावर भर
यंदा खरीप हंगामाकरीता उन्नत शेती, समृद्ध शेतकरी या तत्वानुसार शेतक:यांना तंत्रज्ञान प्रशिक्षण, जमीन आरोग्य पत्रिका वाटप, समृद्ध बियाणे उत्पादनावर तसेच ठिबक (सूक्ष्म) सिंचनावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी कृषी यांत्रिकीकरणावर जोर दिला जाणार आहे.