जिल्ह्यातील १.८५ लाख निराधारांना ‘डीबीटी’द्वारे मिळणार थेट अनुदान

By युवराज गोमास | Published: May 25, 2024 06:22 PM2024-05-25T18:22:05+5:302024-05-25T18:24:21+5:30

कागदपत्रांसाठी ३० मेपर्यंतची डेडलाइन : अन्यथा अनुदान होणार बंद

1.85 lakh destitute in the district will get direct subsidy through 'DBT' | जिल्ह्यातील १.८५ लाख निराधारांना ‘डीबीटी’द्वारे मिळणार थेट अनुदान

1.85 lakh destitute in the district will get direct subsidy through 'DBT'

भंडारा : शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांमुळे जिल्ह्यातील १ लाख ८५ हजार ६४७ पात्र निराधारांना दिलासा मिळतो आहे. त्यांना जगण्याचे आर्थिक बळ लाभत आहे; मात्र निराधारांना लाभ मिळण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी डीबीटी पोर्टल प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रे तलाठी व तहसील कार्यालयात जमा करण्याची ३० मे ही डेडलाइन आहे. वेळेत कागदपत्रे जमा न करणाऱ्यांचे अनुदान बंद होणार आहे.

शासनाच्या विशेष साहाय्य कार्यक्रमाअंर्तगत राबविण्यात येणाऱ्या राज्य पुरस्कृत विविध योजनांच्या निराधार लाभार्थ्यांना दरमहा १,५०० रुपयांचे अदा अनुदान दिले जाते. यापूर्वी योजनांच्या लाभार्थ्यांना मासिक १,००० रुपयांचे अनुदान दिले जात होते. गतवर्षी अनुदानात ५०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही मदत लाभार्थ्यांना तहसील स्तरावरून बँकेत पाठवण्यात येते. बँकेमार्फत मदत खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया केली जाते. मात्र, आता शासनामार्फत सदर अर्थसाहाय्याचे वितरण हे डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून निराधारांच्या थेट खात्यात वर्ग केले जाणार आहे. संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना यापूर्वी तहसील कार्यालयातील संजय गांधी योजना विभागामार्फत बँकेत लाभार्थ्यांची यादी पाठवून निधी दिला जात होता.

प्रशासनाचे लाभार्थ्यांना आवाहन

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवानिवृत्ती वेतन योजनेचे अनुदान आता ‘डीबीटी’मार्फत सरळ लाभार्थ्यांच्या खात्यात दिले जाणार आहे. यासाठी हयात असलेले प्रमाणपत्र, अपडेट आधार कार्ड, बँकेचे पासबुक, मोबाइल क्रमांक आधार ज्या बँकेला लिंक असेल त्याच बँकेत पैसे पाठवण्यात येणार आहेत. लाभार्थ्यांचे दरमहा मानधन आता डीबीटीच्या माध्यमातून थेट बँक खात्यात वर्ग केले जाणार आहे. योजनेच्या लाभार्थ्यांना आधार कार्ड व मोबाइल क्रमांक गावातील तलाठ्याकडे किवा प्रत्यक्ष तहसील कार्यालयात उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

तहसीलदारांच्या तलाठ्यांना सूचना

निराधार योजनेचा लाभ घेत असलेल्या पात्र लाभार्थ्यांना आधार कार्ड आणि मोबाइल क्रमांक संकलित करण्याची प्रक्रिया जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील संजय गांधी योजना विभागाकडून सुरू करण्यात आलेली आहे. याबाबत तहसीलस्तरावरून गावस्तरावरील तलाठ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. ३० मेपर्यंत कागदपत्रे संजय गांधी योजनेच्या कक्षात जमा करावी लागणार आहेत.

जिल्ह्यातील योजनानिहाय लाभार्थी संख्या

संजय गांधी योजना :
सर्वसाधारण लाभार्थी - ३८३२५
अनुसूचित जाती - ८८२०
अनुसूचित जमाती - २०६६

इंदिरा गांधी योजना :
इंदिरा गांधी वृद्धापकाळ - ३८९१२
इंदिरा गांधी विधवा - ६२४२
इंदिरा गांधी दिव्यांग - १९६

श्रावणबाळ योजना :
सर्वसाधारण - ७११८८
अनुसूचित जाती ९१३५
अनुसूचित जमाती - २०५३

"निराधार लाभार्थ्यांना डीबीटी पोर्टलद्वारे थेट अनुदानाचे वितरण होणार आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे तलाठ्यांकडे जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लाभार्थी याद्याही तलाठ्यांकडे सादर करण्यात आल्या आहेत."
- सुरेश वाघचौरे, तहसीलदार, मोहाडी.

Web Title: 1.85 lakh destitute in the district will get direct subsidy through 'DBT'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.