‘त्या’ निधीतून होणार १९ कोटींची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 10:43 PM2019-06-29T22:43:41+5:302019-06-29T22:44:12+5:30
जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत प्रमुख खनिजाच्या स्वामीत्वधनाच्या ३० टक्के रक्कम व गौण खनिजाच्या स्वामीत्वधनाच्या १० टक्के रक्कम जिल्हयाच्या जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या खात्यात जमा करुन त्या रक्कमेतून जिल्हयाचा विकास करण्यात यावा, या करीता केंद्र शासनाने पंतप्रधान खनिज कल्याण क्षेत्र योजना माहे सप्टेंबर २०१६ पासून सुरु केला आहे.
भंडारा : जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत प्रमुख खनिजाच्या स्वामीत्वधनाच्या ३० टक्के रक्कम व गौण खनिजाच्या स्वामीत्वधनाच्या १० टक्के रक्कम जिल्हयाच्या जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या खात्यात जमा करुन त्या रक्कमेतून जिल्हयाचा विकास करण्यात यावा, या करीता केंद्र शासनाने पंतप्रधान खनिज कल्याण क्षेत्र योजना माहे सप्टेंबर २०१६ पासून सुरु केला आहे.
त्या अनुषंगाने जिल्हा खनिज प्रतिष्ठान भंडाराच्या वार्षिक कृती आराखडा सन २०१८-१९ अंतर्गत एकूण १९ कोटी ६८ लाख ७७ हजार रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला. सदर आराखडा अंतर्गत उच्च प्राथम्य बाबीमध्ये पिण्याचे पाणी पुरवठा करीता ४ कोटी, आरोग्याकरीता ४ कोटी, शिक्षणाकरीता ३ कोटी व अन्य पायाभूत सुविधा जसे रस्ते, पूल नाली व पर्यावरण वाढीसाठी आवश्यक घटक इत्यादी ७ कोटी ६८ लक्ष व प्रशासकीय खर्चाकरीता १ कोटी रुपये एवढा निधीच्या तरतूदीचा पालकमंत्री तथा अध्यक्ष शासकीय नियामक परिषद व जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव यांनी सवार्नुमते ठराव घेतला.
पिण्याच्या पाणी पुरवठा योजनेकरीता राखीव ४ कोटी रुपयांच्या अनुषंगाने ३९ गावातील पिण्याच्या पाणी पुरवठा करीता एक गावामध्ये स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना राबविण्यात आली तर जिल्हयातील बहुतांश गावात (३८ गावात) दूषीत पाणी असल्याने जलशुध्दीकरण केंद्र तयार करुन शुध्द पाणी पुरवठा करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. उक्त कामामध्ये अंदाजित खचे २ कोटी २६ लक्ष रुपये अपेक्षित आहे. तसेच गोबरवाही प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत समाविष्ट २२ गावातील पाणी पुरवठा योजनेचे पुर्नजीवन करण्याचे काम सदर निधीतून घेण्याबाबतची कार्यवाही सुरु आहे.
आरोग्य घटक करीता ४ कोटी निधी राखून ठेवण्यात आला असून सदर निधीतून जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे नेत्रविभागात नवीन मायक्रोस्कोप व नेत्रतपासणी मशिन खरेदी करण्यात आली आहे. नेत्र विभागातील शाखेमध्ये सदर साधनाने रुग्णांचे वेळेवर अचूक निदान होऊन आरोग्य सेवेमध्ये सुधारणा झाली आहे.
जिल्हयात नव्याने उभारण्यात आलेल्या रुग्णालयाच्या इमारतीत इनस्टॉल करण्याकरीता नवीन साहित्य उदा. रुग्णांचे पलंग, औधधी टेबल, व्याकुम मशिन, आयसीयु मध्ये लावण्यात येणार पल्स आॅक्सीमिटर, मल्टी पारामिटर मोनिटर, ४० कलर ड्रापलर, अल्ट्रा साऊंड सोनोग्राफी सारखे इतर २८ साहित्य व उपकरण खरेदी करण्यात आली आहे.
विकासाची तरतूद
जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत प्रमुख खनिजाच्या स्वामित्व धनाच्या निधीमधून पिण्याचे पाणी पुरवठा, आरोग्य, शिक्षण, रस्ते, पुल, नाली व पर्यावरण आदि विकास कामांसाठी १९ कोटी ६८ लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून विकास कामांना सुरुवात सुध्दा झाली आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने जिल्हा विकासासाठी मोठया प्रमाणावर खनिज विकास निधी उपलब्ध झाला आहे.
५८ गावातील कामे पूर्णत्वाच्या मार्गावर
पायाभूत सुविधा करीता जिल्हयातील गावांतर्गत रस्ते बांधकाम, नाली बांधकाम, मोरी बांधकाम, सार्वजनिक सभा मंडपाकरीता ७ कोटी ६८ लाख रुपये एवढा निधी राखीव ठेवण्यात आले आहे. त्या अनुषंगाने जिल्हयातील ८८ गावांमध्ये सिमेंट रस्त्यांचे काम, नालीचे कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून ३० गावांमधील कामे पूर्ण झाली आहेत.