जिल्ह्यात आतापर्यंत 193 नामांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2021 05:00 AM2021-12-05T05:00:00+5:302021-12-05T05:00:40+5:30
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. मात्र अद्यापही पक्षांनी आपल्या अधिकृत उमेदवारांची घोषणा केली नाही. त्यामुळे नेमकी कुणाला तिकीट मिळणार याची प्रचंड उत्सुकता दिसुन येत आहे. अनेक पक्षांचे उमेदवार निश्चित झाले असले तरी बंडखोरी टाळण्यासाठी कुणीही आपले उमेदवार घोषीत करीत नाहीत. सोमवार हा नामांकनाचा अखेरचा दिवस असल्याने त्या दिवशी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जाईल.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत नामांकन भरण्यासाठी शनिवारी सर्वच ठिकाणी एकच गर्दी झाली होती. जिल्हा परिषदेसाठी ५७ तर पंचायत समितीसाठी ८४ उमेदवारांनी नामांकन दाखल केले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात १९३ नामांकन दाखल झाले असून त्यात जिल्हा परिषदेचे ८२ तर पंचायत समितीसाठी १११ नामांकनाचा समावेश आहे.
अद्यापही कोणत्याही पक्षाने आपल्या अधिकृत उमेदवाराच्या नावाची घोषणा केली नाही. मात्र आता अवघे दोन दिवस उरल्याने शनिवारी सर्वच ठिकाणी नामांकन दाखल करण्यासाठी गर्दी झाली होती. शनिवारी भंडारा तालुक्यात जिल्हा परिषद गटासाठी ३२ तर पंचायत समिती गणासाठी ४७, लाखांदूर तालुक्यात गटासाठी पाच तर गणासाठी आठ, तुमसर गटासाठी चार तर गणासाठी सहा, साकोली गटासाठी पाच तर गणासाठी सहा, लाखनी गटासाठी सहा तर गणासाठी चार, पवनी गटासाठी एक तर गणासाठी दोन तर मोहाडीत गटासाठी चार आणि गणासाठी नऊ नामांकन दाखल झाले. आतापर्यंत जिल्ह्यात लाखांदूरमध्ये गटासाठी आठ आणि गणासाठी आठ, भंडाऱ्यात गटासाठी ४३ तर गणासाठी ५८, तुमसरमध्ये गटासाठी १३ तर गणासाठी १८, साकोली गटासाठी पाच तर गणासाठी आठ, लाखनीत गटासाठी सहा तर गणासाठी चार, पवनीत गटासाठी एक तर गणासाठी दोन आणि मोहाडीत आतापर्यंत गटासाठी सहा व गणासाठी १३ नामांकन दाखल झाले आहेत.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. मात्र अद्यापही पक्षांनी आपल्या अधिकृत उमेदवारांची घोषणा केली नाही. त्यामुळे नेमकी कुणाला तिकीट मिळणार याची प्रचंड उत्सुकता दिसुन येत आहे. अनेक पक्षांचे उमेदवार निश्चित झाले असले तरी बंडखोरी टाळण्यासाठी कुणीही आपले उमेदवार घोषीत करीत नाहीत. सोमवार हा नामांकनाचा अखेरचा दिवस असल्याने त्या दिवशी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जाईल.
जिल्ह्याचे राजकीय वातावरण आता तापायला लागले असून उमेदवारांनी आपल्या प्रचारालाही सुरुवात केली आहे. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप यांच्यासह अपक्ष रिंगणात राहणार आहेत.
नामांकनासाठी सोमवार अखेरचा दिवस
- नामांकन दाखल करण्याचा सोमवार हा अखेरचा दिवस असून सोमवारी सर्वच इच्छुक नामांकन दाखल करणार आहेत. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी नामांकनासाठी गर्दी होणार आहे. पक्षाचे अधिकृत उमेदवारही त्याच दिवशी नामांकन दाखल करतील. काही पक्षाच्या उमेदवारांनी यापूर्वीच नामांकन दाखल केले असून पक्षाचा अधिकृत एबी फाॅर्म जोडणार आहेत. आता सर्वांचे लक्ष निवडणुकीकडे लागले आहे.
नोडल अधिकारी नियुक्त
- जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले असून त्यात भंडारा एस.एस. मुरवतकर, पवनी एम.जी. डहारे, लाखनी डी.आर. मडावी, साकोली डाॅ.नीलेश वानखेडे, लाखांदूर बंडू पातोडे, तुमसर पाटील तर मोहाडी येथे पल्लवी वाडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.