५५ किमी रस्त्यांसाठी ३२ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 01:09 AM2019-09-06T01:09:30+5:302019-09-06T01:09:57+5:30

भंडारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या रस्त्याच्या दूरवस्थेमुळे आवागमन करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. अशातच यावर्षी ग्रामविकास विभागाने काढलेल्या शासन निर्णयामुळे जिल्ह्यातील २६ रस्त्यांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे.

2 crore for 2 km roads | ५५ किमी रस्त्यांसाठी ३२ कोटी

५५ किमी रस्त्यांसाठी ३२ कोटी

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्री ग्रामसडक योजना : भंडारा वगळता सर्व तालुक्यांचा योजनेत समावेश

देवानंद नंदेश्वर।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून जिल्ह्यातील भंडारा वगळता सर्व तालुक्यात रस्त्यांचे जाळे विणले जाणार आहे. या योजनेंतर्गत २०१९-२० या वित्तीय वर्षात भंडारा जिल्ह्यातील भंडारा तालुका वगळता रस्त्यांची दर्जोन्नती करण्याच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यामध्ये ३१.६२ कोटी रुपये खर्चून ५४.६९ किलोमीटर लांबीचे रस्ते बांधले जाणार आहे.
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने २०१५ मध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यान्वित केली होती. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यत राज्यभरात हजारो किलोमीटरचे रस्ते बांधण्यात आले आहे. भंडारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या रस्त्याच्या दूरवस्थेमुळे आवागमन करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. अशातच यावर्षी ग्रामविकास विभागाने काढलेल्या शासन निर्णयामुळे जिल्ह्यातील २६ रस्त्यांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रधानमंत्री, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या मुख्य अभियंत्यांनी रस्त्याच्या दर्जोन्नती करण्यासाठी ई-टेंडरिंग करुनच कार्यारंभाचे आदेश द्यावेत, अशी सूचना केली आहे.

योजनेतून भंडारा तालुका बाद
भंडारा तालुक्यातील बहुतांश रस्ते खड्डेमय असताना मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत यावर्षी भंडारा तालुक्यातील एकही रस्त्यांच्या दर्जोन्नती करण्याच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

देखभाल दुरुस्तीसाठी २ कोटी २० लाख
सातही तालुक्यातील एकूण ५४.६९ किलोमिटरच्या लांबीच्या रस्त्याला ग्रामविकास विभागाने मंजुरी दिली असताना या कामाची ५ वर्षे नियमित देखभाल व दुरुस्तीसाठी २.२० कोटींची तरतूद केली आहे. ही तरतूद रस्तानिहाय तालुकास्तरावर करण्यात आली. लवकरच प्रशासकीय मान्यता मिळालेल्या २६ कामाला प्रारंभ होणार आहे. रस्त्याची कामे पुर्ण झाल्यानंतर कामाची पाच वर्ष नियमित देखभाल व दुरुस्तीची गरज आहे.
बोदरा ते खैरी पिंडकेपार रस्त्यासाठी सर्वाधिक निधी
तुमसर तालुक्यात नऊ, मोहाडी व पवनीत तालुक्यात प्रत्येकी पाच, लाखांदूर दोन, साकोली एक, तर लाखनी तालुक्यातील चार रस्ता कामाच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली. यात साकोली तालुक्यात बोदरा ते खैरी पिंडकेपार या ३.७४ किमीसाठी २६४.१९ लाखांचा सर्वाधिक निधी मंजूर करण्यात आला आहे. सर्वात कमी निधी पवनी तालुक्यातील प्रजिमा ४० ते पौना या ०.७५ किलोमीटर रस्त्यासाठी २९.४० लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

Web Title: 2 crore for 2 km roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.