दोघांना २ लाख ४४ हजारांचा ऑनलाईन गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2022 05:00 AM2022-01-13T05:00:00+5:302022-01-13T05:00:53+5:30
वसंत आनंदराव पडोळे याने आपला मित्र अशोक शामराव सारंगपुरे रा. हरदोली याच्याकडून ४ हजार ८०० रुपये घेतले होते. ते पेटीएम ॲपद्वारे परत करीत होता. त्यावेळी पैसे मित्राच्या अकाउंटमध्ये जमा न होता ते पेटीएमच्या वाॅलेटवर जमा झाले. त्यामुळे वसंतने पेटीएमच्या कस्टमर केअरवर संपर्क साधला. त्यावेळी त्याच्या मोबाईलवर एक लिंक देण्यात आली. त्यावर मोबाईल नंबर पाठविण्यास सांगितले. कस्टमर केअरने दिलेल्या नंबरवर माहिती पाठविताच काही वेळात वसंतच्या बचत खात्यातून ९४ हजार ४९७ रुपये वळते झाले.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी जनजागृती करण्यात येत असली तरी थोड्या लालसेपायी अनेक जण आजही भामट्यांच्या जाळ्यात अडकत आहेत. जिल्ह्यातील हरदोली आणि पवनी येथील दोघांना २ लाख ४४ हजारांचा ऑनलाईन गंडा घालण्याची घटना मंगळवारी उघडकीस आली.
तुमसर तालुक्यातील कर्कापूर येथील वसंत आनंदराव पडोळे याने आपला मित्र अशोक शामराव सारंगपुरे रा. हरदोली याच्याकडून ४ हजार ८०० रुपये घेतले होते. ते पेटीएम ॲपद्वारे परत करीत होता. त्यावेळी पैसे मित्राच्या अकाउंटमध्ये जमा न होता ते पेटीएमच्या वाॅलेटवर जमा झाले. त्यामुळे वसंतने पेटीएमच्या कस्टमर केअरवर संपर्क साधला. त्यावेळी त्याच्या मोबाईलवर एक लिंक देण्यात आली. त्यावर मोबाईल नंबर पाठविण्यास सांगितले. कस्टमर केअरने दिलेल्या नंबरवर माहिती पाठविताच काही वेळात वसंतच्या बचत खात्यातून ९४ हजार ४९७ रुपये वळते झाले. याबाबत त्याने पुन्हा कस्टमर केअरशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सिहोरा ठाण्यात तक्रार दाखल केली.
दुसरी घटना पवनी येथील सोमवारी वाॅर्डात घडली. निधी शंकर भोगे (२०) असे फसवणूक झालेल्या तरुणीचे नाव आहे. तिच्या मोबाईलवर ऑनलाईन शाॅपिंग साईडमध्ये कमीशन देण्याचे आमिष एका भामट्याने दिले. त्याच्या या आमिषाला बळी पडत तिने व्हॉट्सॲप ऑनलाईन शाॅपिंग सुरु केले; मात्र तिची १ लाख ५० हजार रुपयाने फसवणूक केल्याचे पुढे आले. अखेर पवनी ठाण्यात गुन्हा नोंदविला.
आमिषाला बळी पडू नका
- अलीकडे ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. विविध ॲपद्वारे आणि लिंकच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार सुरु आहेत. जिल्ह्यात यापूर्वीही अनेक घटना घडल्या. मात्र त्यानंतरही भामटे नवनवीन क्लुप्त्या करुन अनेकांना जाळ्यात ओढत आहेत.