१०० मीटरचे अंतर गाठायला लागला २० दिवसांचा कालावधी

By admin | Published: February 2, 2017 12:15 AM2017-02-02T00:15:43+5:302017-02-02T00:15:43+5:30

शीर्षक वाचून आश्चर्य वाटले असेल ना! होय, परंतु हे वास्तव आहे.

The 20-day period has begun to reach a distance of 100 meters | १०० मीटरचे अंतर गाठायला लागला २० दिवसांचा कालावधी

१०० मीटरचे अंतर गाठायला लागला २० दिवसांचा कालावधी

Next

कार्यवृत्त अहवाल : जि.प. अध्यक्षांच्या सूचनांना दिली बगल
प्रशांत देसाई भंडारा
शीर्षक वाचून आश्चर्य वाटले असेल ना! होय, परंतु हे वास्तव आहे. मात्र हे अंतर एखाद्या स्पर्धकाचे नाही. शासकीय यंत्रणेतील कार्यप्रणालीत असलेल्या उणिवांमुळे हा प्रकार घडलेला आहे. जिल्हा परिषद प्रशासनातील ‘लेटलतिफ’ कारभाराचा हा फटका सर्वसामान्यांना बसलेला नसून तो खुद्द जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर आणि पदाधिकाऱ्यांना बसला आहे. लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून अधिकाऱ्यांनी जणू ही चपराकच दिली आहे.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा १३ जानेवारीला पार पडली. यात जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांनी समिती सचिवांना कार्यवृत्त अहवाल सात दिवसात सादर करण्याच्या सूचना देऊन ठराव घेतला. मात्र हा अहवाल अध्यक्षांना तब्बल २० दिवसानंतर आज प्राप्त झाला. जिल्हा परिषद अध्यक्ष व समिती सचिव वाळके यांच्या कक्षात केवळ १०० मिटरचे अंतर असतानाही या अहवालासाठी २० दिवसांचा कालावधी लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
जिल्हा परिषद स्थायी व सर्वसाधारण सभेचे पदसिध्द सचिव म्हणून उप मुख्यकार्यकारी अधिकारी (सामान्य) प्रशासन सुधीर वाळके यांच्यावर जबाबदारी आहे. मागील काही दिवसांपासून जिल्हा परिषदमध्ये सुरु असलेल्या वादग्रस्त कारणाने सर्वांचे लक्ष जि.प. वर लागलेले आहे. यात ‘प्रोसिडींग’ची भर पडली आहे.
जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांच्या कक्षात १३ जानेवारीला घेण्यात आली. या सभेला समिती सचिव सुधीर वाळके यांच्यासह प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर व सर्व विभाग प्रमुखांसह जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती.
या सभेत अनेक ठराव पारित करण्यात आले. त्या ठरावांची अंमलबजावणी करण्यात जिल्हा परिषद प्रशासन कितपत यशस्वी होते, हा औत्सुक्याचा विषय आहे. मात्र या सभेत जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांनी सभेतील कार्यवृत्त अहवाल सात दिवसात त्यांना द्यावे अशा सूचना देऊन तो ठराव पारित करण्यात आला. मात्र आज बुधवारला तब्बल २० दिवस लोटल्यानंतर हा अहवाल जिल्हा परिषद अध्यक्षांच्या स्विय सहायकांना प्राप्त झाल्याची माहिती गिलोरकर यांनी ‘लोकमत’ ला दिली.
अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांचे कक्ष ते पदसिद्ध समिती सचिव उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके यांच्या कक्षादरम्यान २५ पायऱ्या असून सुमारे १०० मीटरचे अंतर आहे. वाळके यांचे सहायक शर्मा यांच्यावर हा कार्यवृत्त अहवाल तयार करण्याची जबाबदारी सोपविली होती. मात्र अध्यक्षांनी सात दिवसांचे निर्देश दिल्यानंतरही माशी कुठे शिंकली कुणास ठाऊक, हा अहवाल बनायला तब्बल २० दिवसांचा कालावधी लागला. त्यामुळे जिल्हा परिषदमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर आता प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.
कार्यवृत्त अहवाल तयार व्हायला जर २० दिवसांचा कालावधी लागत असेल तर सभेत घेतलेल्या ठरावांची अंमलबजावणी होत असेल काय? जर ते होत असल्यास त्याला किती दिवसांचा कालावधी लागेल असेल या प्रकारावरूनच याचा अंदाज बांधता येईल. याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) सुधीर वाळके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

लपाच्या प्रभारावर पदाधिकाऱ्यांचे वस्त्रहरण
जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पराते हे दीड महिन्याच्या वैद्यकीय रजेवर गेले आहेत. त्यामुळे त्यांचा प्रभार देण्याबाबत अधिकारी व पदाधिकारी यांच्यात एकमत झाले नाही. दरम्यान बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. एल. शेळके यांच्याकडे प्रभार देण्यात आला. दरम्यान, स्थायी समितीत शेळकेंकडून प्रभार काढून आर. एच. गुप्ता यांना देण्याचा ठराव पारित झाला. मात्र या ठरावाला व जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या आदेशाला न जुमानता अजूनही कार्यभार शेळके यांच्याकडे ठेवून अधिकाऱ्यांनी जणू पदाधिकाऱ्यांचे वस्त्रहरणच केल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

कार्यवृत्ताचा अहवाल सात दिवसात सादर करण्याच्या सूचना सचिवांना दिल्या होत्या. मात्र पदसिद्ध सचिव सुधिर वाळके यांनी त्याचे पालन केलेले नाही. त्यामुळे सुचनांचे पालन करण्यात अपयशी ठरलेले वाळके हे प्रशासन कसे सांभाळतात याबाबत शंका उपस्थित होते.
- भाग्यश्री गिलोरकर,
अध्यक्ष, जि.प. भंडारा

Web Title: The 20-day period has begun to reach a distance of 100 meters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.