जिल्ह्यात ३३ दिवसात २०१ मिमी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 11:00 PM2019-07-03T23:00:49+5:302019-07-03T23:01:11+5:30
जिल्ह्यात ३३ दिवसात २०१.५ मिमी पावसाची नोंद झाली असली तरी खरा पाऊस हा गत आठवड्यातीलच आहे. तब्बल महिनाभराच्या दडीनंतर पावसाचे आगमन झाले असून गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस कोसळत आहे. यामुळे बळीराजा सुखावला असून रोवणीच्या कामाला वेग आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात ३३ दिवसात २०१.५ मिमी पावसाची नोंद झाली असली तरी खरा पाऊस हा गत आठवड्यातीलच आहे. तब्बल महिनाभराच्या दडीनंतर पावसाचे आगमन झाले असून गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस कोसळत आहे. यामुळे बळीराजा सुखावला असून रोवणीच्या कामाला वेग आला आहे.
भंडारा जिल्ह्यात पावसाची वार्षिक सरासरी १३३०.२ मिमी आहे. १ जून ते ३ जुलै पर्यंत २३८.७ मिमी पाऊस कोसळतो. मात्र सध्या जिल्ह्यात या कालावधीत २०१.५ मिमी पाऊस कोसळला आहे. विशेष म्हणजे गतवर्षीही याच कालावधीत २३१.७ मिमी पाऊस कोसळला होता. १ ते ३ जून पर्यंत पडणाऱ्या पावसाची सरासरी ८४ टक्के आहे.
भंडारा तालुक्यात आतापर्यंत २३१.३ मिमी, मोहाडी २१७.३ मिमी, तुमसर २७३.८ मिमी, पवनी १४८.१ मिमी, साकोली २१५.२ मिमी, लाखांदूर १७५.७ मिमी, लाखनी १४९.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस तुमसर तालुक्यात कोसळला आहे. समाधानकारक पावसाने जिल्ह्यातील शेतकरी सुखावला आहे. आकाशाकडे डोळे लावून बसलेला शेतकरी आता धान रोवणीच्या कामाला लागला आहे. जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी अद्यापही जलसाठ्यात कोणतीच वाढ झाली नाही.
गोसेखुर्द प्रकल्पाचा उपयुक्त जलसाठा अद्यापही निरंक आहे. या प्रकल्पाचा एकुण साठा १४६.०८ दलघमी आहे. तर उपयुक्त पाणी साठा ७४०.१७ दलघमी आहे. पाणलोट क्षेत्रात ११३ मिमी पावसाची नोंद झाली असली तरी या प्रकल्पाच्या पाण्यात कोणतीही वाढ झाली नाही.
२४ तासात ६० मिमी पाऊस
भंडारा जिल्ह्यात गत २४ तासात ६०.०३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. सर्वाधिक पाऊस तुमसर तालुक्यात ८९.२ मिमी तर सर्वात कमी पाऊस भंडारा तालुक्यात ४० मिमी कोसळला. बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण असून जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.