208 गावांना बसणार 50 पेक्षा अधिक पैसेवारीचा माेठा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 05:00 AM2021-01-03T05:00:00+5:302021-01-03T05:00:52+5:30
५० पेक्षा कमी पेसेवारी असलेल्या गावांना दुष्काळी सवलती मिळतात. त्यात जमीन महसलात सूट, शेतकऱ्याच्या कर्जाची वसुली सक्तीने न करणे, सहकारी कर्जाचे पुर्नगठण, शेतकऱ्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफ असा सवलतींचा समावेश असताे. मात्र आता चार तालुक्यातील २०८ गावे या सवलतीपासून वंचित राहणार आहेत. जिल्ह्यात ८९८ गावे असून खरीपाच्या गावांची संख्या ८८४ आहे. त्यापैकी ४० गावांची पैसेवारी घाेषित करण्यात आली नाही.
भंडारा : अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि महापुरानंतर जिल्ह्यातील सर्व गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी येईल अशी आशा सर्व शेतकऱ्यांना हाेती. मात्र दाेन दिवसांपूर्वी घाेषित केलेल्या पैसेवारीत ८८४ गावांपैकी २०८ गावांची पैसेवारी ५० पेक्षा अधिक आहे. त्यामुळे या गावांना दुष्काळी सवलतीचा काेणताही फायदा मिळणार नाही. भंडारा, पवनी, तुमसर आणि माेहाडी या चार तालुक्यातीलच ही सर्व गावे आहेत. साकाेली, लाखांदूर आणि लाखनी तालुक्यातील सर्व गावे ५० पेक्षा कमी पैसेवारीत आहेत.
५० पेक्षा कमी पेसेवारी असलेल्या गावांना दुष्काळी सवलती मिळतात. त्यात जमीन महसलात सूट, शेतकऱ्याच्या कर्जाची वसुली सक्तीने न करणे, सहकारी कर्जाचे पुर्नगठण, शेतकऱ्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफ असा सवलतींचा समावेश असताे. मात्र आता चार तालुक्यातील २०८ गावे या सवलतीपासून वंचित राहणार आहेत. जिल्ह्यात ८९८ गावे असून खरीपाच्या गावांची संख्या ८८४ आहे. त्यापैकी ४० गावांची पैसेवारी घाेषित करण्यात आली नाही. ८४४ गावांपैकी ६३६ गावे ५० पैशापेक्षा कमी आहेत तर २०८ गावांची पैसेवारी ५० पेक्षा अधिक आहे. यात भंडारा तालुक्यातील ४४, पवनी तालुक्यातील ५२, तुमसर तालुक्यातील ४८ आणि माेहाडी तालुक्यातील ६४ गावांचा समावेश आहे. हे चार तालुके भंडारा आणि तुमसर विधानसभा क्षेत्रातील आहेत. विशेष म्हणजे साकाेली विधानसभा मतदार संघाच्या क्षेत्रात येणारे साकाेली, लाखांदूर आणि लाखनी या तीन तालुक्यातील संपूर्ण गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामाची स्थिती अतिशय बिकट हाेती. सुरुवातीला अवकाळी पाऊस त्यानंतर ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी आणि महापुराचा फटका बसला. यातून शेतकरी सावरत नाही ताेच तुडतुड्याने आक्रमण केले. अनेक शेतकऱ्यांनी उभ्या धानाला आग लावून दिली हाेती. हिंमत करून मळणी केलेल्या शेतकऱ्यांना निम्माच उतारा आला.
लागवड खर्चही निघणे कठीण झाले. महागडे बियाणे, मजूर टंचाई आदींचा सामना करताना शेतकरी हतबल झाले आहेत. नैसर्गिक प्रकाेपाने माेडकळीस आले आहेत. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील सर्व गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी येईल, अशी अपेक्षा हाेती. मात्र अंतिम पैसेवारीने २०८ गावांना फटका बसला.
लाेकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
जिल्ह्यात विधानसभेचे तीन मतदार संघ आहेत. त्यापैकी साकाेली मतदार संघातील सर्व गावे ५० पेक्षा कमी पैसेवारीची आहेत. तर भंडारा आणि तुमसर विधानसभा मतदार संघातील ही २०८ गावे आहेत. त्यात भंडारा विधानसभा मतदार संघातील ९६, तुमसर विधानसभा संघातील ११२ गावांचा समावेश आहे. अंतिम पैसेवारी घाेषित हाेऊन दाेन दिवस झाले मात्र लाेकप्रतिनिधींनी याबाबत अवाक्षरही उच्चारले नाही. शासनाने घाेषित केलेल्या या पैसेवारीकडे लाेकप्रतिनीधींनी दुर्लक्ष केले तर नाही ना? असा सवाल आता निर्माण झाला आहे.