गरज २१५ कोटींची; जिल्ह्याला मिळाले केवळ १८ कोटी, जल जीवन मिशन अडचणीत
By युवराज गोमास | Updated: September 18, 2023 15:13 IST2023-09-18T15:13:08+5:302023-09-18T15:13:38+5:30
जिल्ह्यात ६९२ पैकी २१९ कामे पूर्ण

गरज २१५ कोटींची; जिल्ह्याला मिळाले केवळ १८ कोटी, जल जीवन मिशन अडचणीत
युवराज गोमासे/ भंडारा: जिल्ह्यात केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन योजनेतंर्गत ६९२ पाणी पुरवठा योजनांना मंजुरी मिळाली. या योजनांच्या पूर्णत्वासाठी सुमारे २१५ कोटी रूपयांची गरज आहे. परंतु, एप्रिल २०२३ नंतर केवळ १८ कोटींचा निधी जल जीवन मिशनवर खर्च झाला. निधीअभावी कामे अडचणीत सापडली आहेत. त्यामुळे ६९२ पैकी केवळ २१९ कामे पूर्ण झाली. २०२४ पर्यंत कामे पूर्ण होण्यासाठी पर्याप्त निधी देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
केंद्र शासनाने 'हर घर नल' या संकल्पानुसार २०२४ पर्यंत ग्रामीण कुटुंबाना पुरेसे व सुरक्षीत पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्शन पुरविण्यासाठी जल जीवन मिशन सुरू केले. या योजनेतंर्गत प्रत्येक कुटुंबाला प्रतिव्यक्ती ५५ लिटर पाणी देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्या अनुसंगाने घरगुती नळ कनेक्शनसाठी व पाणी पुरवठा योजनांच्या पायाभुत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. परंतु, जिल्ह्यात निधीअभावी या योजनेला खिळ बसली आहे. पाणी पुरवठा योजना अपूर्णावस्थेत आहेत.
भंडारा जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत २१५ कोटींच्या आराखड्यातंर्गत ६९२ कामांना मंजुरी मिळाली. जिल्ह्यातील १३५ गावे 'हर घर नल' घोषीत करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या जल जीवन मिशन विभागाच्या माध्यमातून कामे वेळेत व गतीने व्हावीत, यासाठी जलदगतीने पाऊले उचलण्यात आली. निर्धारीत कालावधीत कामे पूर्ण होण्यासाठी संबंधित गावांत कामांचा प्रारंभ करण्यात आला. सप्टेंबर २०२३ पर्यंत ६९२ कामांपैकी २१९ कामे पूर्ण झाली. परंतु, एप्रिलनंतर जल जीवन मिशनला केवळ १८ कोटींचा निधी प्राप्त झाला व खर्च झाला. त्यानंतरचा निधी अद्यापही प्राप्त झालेला नाही. निधी अभावी योजना अडचणीत सापडल्या आहेत.
१.८९ लाख घरांत नळ कनेक्शन
सन २०२४ पर्यंत जिल्ह्यात २ लाख ५६ हजार ३०९ घरात शुद्ध पिण्याच्या पाण्याचे नळ पुरविण्याचे उदिष्ट ठरविण्यात आले. त्यापैकी १२ सप्टेंबर २०२३ पर्यंत एकूण १ लाख ८९ हजार १३१ घरात नळ कनेक्शन बसविण्यात आले. नळ कनेक्शनची टक्केवारी ७३.७९ इतकी आहे. उर्वरीत नळ कनेक्शन पुरविण्यासाठी शासनाच्या पर्याप्त निधीची गरज आहे.
जिल्ह्यातील २,५६,३०९ घरात शुद्ध पिण्याच्या पाण्याचे नळ पुरविण्याचे अनुसंगाने १३५ गावे हर घर नल ग्राम घोषीत करण्यात आली. जिल्ह्यात सप्टेंबर २०२३ पर्यंत मंजूर ६९२ पाणी पुरवठा योजनांपैकी सुमारे २१९ कामे पूर्ण झाली आहे. उर्वरीत कामे प्रगतीपथावर आहेत. एप्रिल २०२३ पासून १८ कोटींचा निधी खर्च झाला. उर्वरीत निधीची मागणी केली आहे.
- व्ही. एम. देशमुख, कार्यकारी अभियंता, जि. प. भंडारा.