महामार्गावरील २१९ मदिरालये बंद

By Admin | Published: April 2, 2017 12:20 AM2017-04-02T00:20:37+5:302017-04-02T00:20:37+5:30

राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गावर ५०० मीटरच्या आत असलेले देशी व विदेशी दारूची दुकाने हटविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे भंडारा जिल्ह्यातील २४९ पैकी २१९ दारूची दुकाने बंद झाली आहेत.

219 spirits off the highway | महामार्गावरील २१९ मदिरालये बंद

महामार्गावरील २१९ मदिरालये बंद

googlenewsNext

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा फटका : बारबंदीमुळे तळीराम झाले सैरभैर
भंडारा : राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गावर ५०० मीटरच्या आत असलेले देशी व विदेशी दारूची दुकाने हटविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे भंडारा जिल्ह्यातील २४९ पैकी २१९ दारूची दुकाने बंद झाली आहेत. या महामार्गापासून लांब अंतरावर असलेल्या ३० दुकानांना या निर्णयाचा फटका बसलेला नाही. दरम्यान, महामार्गावरील दारू दुकानांमधील मद्यपिंची दररोजची वर्दळ थांबल्याचे चित्र दिसून आले आहे.
महामार्गावर असलेल्या दारू विक्रीच्या दुकानांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून या अपघातात जीवितहाणीची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. हा निष्कर्ष न्यायालयात पोहोचल्यानंतर सर्वोच न्यायालयाने डिसेंबर २०१६ मध्ये राष्ट्रीय व राज्य मार्गावरील ५०० मीटरच्या आत असलेले देशी-विदेशी दारूचे दुकाने हटविण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशाची अंमलबजावणी होत ३१ मार्चपासून हे दुकाने बंद झाली आहेत.
भंडारा जिल्ह्यात देशी दारूची किरकोळ विक्रीची ६९ दुकाने, ०७ वाईन शॉप, १५१ बार व परमीटरूम आणि २२ बिअर शॉपी असे एकूण २४९ दुकाने आहेत. या आदेशामुळे देशी दारूची किरकोळ विक्रीची ४९ दुकाने, ०७ वाईन शॉप, १४४ बार व परमीटरूम आणि १९ बिअर शॉपी असे एकूण २१९ दुकाने बंद झाली आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या डिसेंबर महिन्यातील आदेशानंतर राज्य सरकारने उत्पादन शुल्क विभागाला सर्व्हेक्षण करून जिल्हास्तरीय अहवाल मागितला होता.
त्यानंतर भंडारा जिल्हा उत्पादन शुल्क विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाला जिल्ह्यात किती राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्ग आहेत, या महामार्गाचा क्रमांक कोणता आणि नकाशा यासह माहिती मागितली होती. बांधकाम विभागाच्या माहितीनुसार उत्पादन शुल्क विभागाने हा अहवाल शासनाकडे पाठविला होता.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भंडारा जिल्ह्यातील महामार्गावर असलेले ६५ टक्के दुकाने असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. या आशयाचे वृत्त ५ जानेवारी रोजी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाले होते. परंतु प्रत्यक्षात अंतिम अहवालाअंती जिल्ह्यात ८८ टक्के दारूची दुकाने महामार्गावर असल्याचे आजच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

बीअरबारला टाळे ; तळीरामांची फजिती
मोहाडी : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने देशातील महामार्गावरील दारू दुकाने १ एप्रिलपासून बंद झाले आहेत. मोहाडी येथीलही चार बीअर बार व दोन देशी दारूची दुकाने बंद असल्याचे चित्र दिसून आले. मात्र काही बिअरबारमध्ये मागच्या दारातून लपूनछपून दारू विक्री सुरू होती. काही विशिष्ट व्यक्तींच्या घरूनसुद्धा तळीरामांना दारू विकण्यात आल्याची मोहाडीत चर्चा होती. मात्र याकडे पोलीस किंवा दारूबंदी विभागाचे अधिकारी फिरकले नाहीत.
मोहाडी येथे भंडारा-तुमसर राज्य महामार्गाला लागूनच थोड्याथोड्या अंतरावर चार बीअर बार तर मोहाडी आंधळगाव राज्य मार्गावर दोन देशी दारूची दुकाने आहेत. त्यांना आता ५०० मीटर अंतराच्या दूर दुकान सुरू करता येणार असल्यामुळे त्यादिशेने त्या दारू दुकानदारांची धावपळ सुरू आहे. दारू दुकानातील शिल्लक साठा विकण्यासाठी क्लृप्त्या लढविण्यात येत आहे. बहुतांश बार मालकाकडे साठा असताना त्यांनी उत्पादन शुल्क विभागाला अल्प साठा असल्याचे सांगून मागच्या दाराने विकण्याचे कामे करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)
तळीरामांची उडाली झोप
लाखनी : सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करीत राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गालगतचे बीअर बार, बीअर शॉपी व देशी दारूच्या दुकानांना सील करण्यात आले. त्यामुळे तळीरामांची झोप उडाली असून अन्य पर्यायांच्या शोधात तळीराम शनिवारला दिवसभर भटकताना दिसून आले.
१ एप्रिलपासून अंमलबजावणी करण्यात आल्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त मोहिमेत ३१ मार्चच्या मध्यरात्री पासून बीअर बार, बीअर शॉपी व देशी दारू दुकानाला सील लावल्यामुळे तळीरामांची पंचाईत झाली आहे.
लाखनी परिसरात मार्गालगत १५ बीअर, शॉपी व देशी दारू दुकाने असून ते बंद असल्याने तळीरामांचे जिथे कुठे मिळेल म्हणून एकमेकांना विचारताना दिसून आले असून मोहफुलाच्या दारूसह मिळेल त्या पर्यायाच्या शोधात भटकताना दिसून आले. (शहर प्रतिनिधी)

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार भंडारा जिल्ह्याच्या हद्दीत येणारे राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील पाचशे मीटरच्या आतील २४९ पैकी २१९ दारूची दुकाने ३१ मार्चपासून बंद झाली आहेत.
-सुरेंद्र मनपिया, अधीक्षक,
उत्पादन शुल्क विभाग भंडारा.

Web Title: 219 spirits off the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.