जिल्ह्यात २२ लाख क्विंटल धान भरडाईच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:06 AM2021-02-18T05:06:32+5:302021-02-18T05:06:32+5:30

भंडारा जिल्ह्यात १ नोव्हेंबरपासून आधारभूत धान खरेदीला सुरुवात झाली. जिल्ह्यात सध्या १३४ केंद्रांवर खरेदी सुरू आहे. आतापर्यंत २२ लाख ...

22 lakh quintals of paddy awaited in the district | जिल्ह्यात २२ लाख क्विंटल धान भरडाईच्या प्रतीक्षेत

जिल्ह्यात २२ लाख क्विंटल धान भरडाईच्या प्रतीक्षेत

Next

भंडारा जिल्ह्यात १ नोव्हेंबरपासून आधारभूत धान खरेदीला सुरुवात झाली. जिल्ह्यात सध्या १३४ केंद्रांवर खरेदी सुरू आहे. आतापर्यंत २२ लाख ६९ हजार ४३९ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. मात्र, अद्यापपर्यंत एक क्विंटलही धान मिलर्सनी भरडाईसाठी उचलला नाही. धान भरडाईचे दर वाढवून द्यावे, या मागणीसाठी गत महिनाभरापासून त्यांनी असहकार आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण धान गोदाम हाऊसफुल्ल झाले आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील गोदामांची क्षमता आठ लाख क्विंटल आहे. उर्वरित संपूर्ण धान उघड्यावर आहेत. जिल्ह्यातील बहुतांश केंद्रावर धान पोत्याच्या थप्प्या उघड्यावर असल्याचे चित्र आहे. मिलर्स आणि शासन यांच्यात आतापर्यंत तीन ते चारवेळा चर्चा झाली; परंतु कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे धान सद्य:स्थितीत उघड्यावर आहे.

मंगळवारी सायंकाळपासून वातावरणात अचानक बदल होऊन जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पाऊस बरसला. या अवकाळी पावसाने उघड्यावरील धान ओला होत आहे. विशेष म्हणजे केंद्रावर असलेल्या धानाची संपूर्ण जबाबदारी खरेदी करणाऱ्या संस्थेची असते. संस्थेसोबत विक्रीच्या प्रतीक्षेत असलेला शेतकऱ्यांचा धानही ओला झाला. वातावरणात बदल होताच अनेक शेतकऱ्यांनी आधारभूत केंद्राकडे धाव घेऊन धान पोती झाकण्याचा प्रयत्न केला, तर संस्थांनी आपल्याकडील त्रिपाल झाकून धान पोत्याचे पावसापासून रक्षण करण्याचा प्रयत्न केला. परंतु मोठ्या प्रमाणात असलेला धान त्रिपालने झाकने शक्य होत नाही. परिणामी अनेक केंद्रावरील धानाला पावसाचा फटका बसला.

बॉक्स

तिढा लवकर सुटण्याची चिन्हे

धान भरडाईवरून निर्माण झालेला तिढा लवकर सुटण्याची चिन्हे आहेत. मंगळवारी यासंदर्भात मुंबई येथे बैठक झाल्याची माहिती आहे. मात्र, या बैठकीत नेमके काय झाले हे कळू शकले नाही. परंतु लवकरच भरडाईचा तिढा सुटेल, अशी आशा आहे.

बॉक्स

सर्वाधिक धान खरेदी लाखांदूर तालुक्यात

जिल्ह्यात सर्वाधिक धान खरेदी लाखांदूर तालुक्यात झाली आहे. २१ केंद्रांवर १६ फेब्रुवारीपर्यंत पाच लाख ९ हजार ४७५ क्विंटल खरेदी झाली आहे. त्या खालोखाल तुमसर तालुक्यातील २५ केंद्रांवर चार लाख ५८ हजार ३१७ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. भंडारा तालुक्यातील १७ केंद्रांवर एक लाख ७९ हजार ४४८ क्विंटल, मोहाडी तालुक्यातील २२ केंद्रांवर तीन लाख २४ हजार ७० क्विंटल, लाखनी तालुक्यातील १४ केंद्रांवर दोन लाख ९५ हजार ४२८ क्विंटल, साकोली तालुक्यातील १८ केंद्रांवर तीन लाख पाच हजार ८४० क्विंटल आणि पवनी तालुक्यातील १७ केंद्रांवर एक लाख ९६ हजार ८९८ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे.

Web Title: 22 lakh quintals of paddy awaited in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.