मोहरणा येथे २३ जोडपी विवाहबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:17 AM2019-04-27T00:17:08+5:302019-04-27T00:17:29+5:30
शासनाच्या चुकीच्या शेतीविषयक धोरणामुळे शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगितेतून शेतकऱ्यांचे जीवन सुखी व समृद्ध व्हावे, यासाठी सामूहिक विवाह सोहळ्याची संकल्पना सांगितली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदुर : शासनाच्या चुकीच्या शेतीविषयक धोरणामुळे शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगितेतून शेतकऱ्यांचे जीवन सुखी व समृद्ध व्हावे, यासाठी सामूहिक विवाह सोहळ्याची संकल्पना सांगितली आहे. त्यामुळे गत दहा वर्षांपासून सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा हा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन माजी खासदार नाना पटोले यांनी केले.
लाखांदूर तालुक्यातील मोहरणा येथे ओबीसी छावा संग्राम परिषदेच्या वतीने आयोजीत सामूहिक विवाह सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार सेवक वाघाये, जेसा मोटवानी, अॅड. संजय गुरू, जिल्हा परिषद सदस्य मनोहर राऊत, प्रणाली ठाकरे, शुद्धमता नंदागवळी, प्रमिला कुटे, सभापती मंगला बगमारे, भरत खंडाईत, रामचंद्र राऊत, चंद्रशेखर ठवरे, रमेश भैय्या, योगेश कुटे, गोपीचंद राऊत, वासुदेव तोंडरे, सरपंच प्रभाकर मेंढे, उपसरपंच बबन नागोसे, भुमेश्वर महावाडे, नरेश दिवटे, ताराचंद मातेरे, गजानन नाकतोडे, सुभाष आजबले, राजु पालीवाल, अशोक चांडक आदी उपस्थित होते.
या विवाह सोहळ्यात २३ जोडपी विवाहबद्ध झाली. त्यात ८ जोडपी बौद्ध धर्माची होती. आठ जोडप्यांचा विवाह बौध्द पद्धतीने तर १५ जोडप्यांचा विवाह हिंदू पद्धतीने पार पाडण्यात आला. विवाहबद्ध झालेल्या २३ जोडप्यांना नाना पटोले यांनी कपडे व एलईडी भेट स्वरूपात देऊन स्वत: पालकत्व स्विकारून कन्यादान देखील केले.
विवाह सोहळ्याचे प्रास्ताविक नाना पिलारे यांनी केल. संचालन यशवंत नखाते यांनी, तर आभार प्रदर्शन मंगेश राऊत यांनी केले. सामूहिक विवाह सोहळ्यासाठी छावा संग्राम परिषद व मोहरणा ग्रामवासीयांनी सहकार्य केल.