२३ हेक्टरचा तलाव उरला ७.३१ हेक्टरचा
By admin | Published: May 29, 2015 12:58 AM2015-05-29T00:58:19+5:302015-05-29T00:58:19+5:30
तलावांचा जिल्हा म्हणून भंडारा जिल्ह्याची राज्यात नोंद असली तरी काही तलाव बुजले तर बहुतांश तलाव अतिक्रमणधारकांनी बळकावले आहेत.
मोहन भोयर तुमसर
तलावांचा जिल्हा म्हणून भंडारा जिल्ह्याची राज्यात नोंद असली तरी काही तलाव बुजले तर बहुतांश तलाव अतिक्रमणधारकांनी बळकावले आहेत. तुमसर तालुक्यातील आष्टी येथे सर्वाधिक ५८ तलाव होते. आता केवळ १४ तलाव शिल्लक राहिले असून २३ हेक्टरचे तलाव ७.३१ हेक्टरचे उरले आहेत. उल्लेखनीय म्हणजे, तलावाच्या मालकीवरुन जिल्हा परिषद व लघुपाटबंधारे विभागाची एकमेकावर कुरघोडी सुरू आहे.
भंडारा जिल्ह्यात शासनदप्तरी १,१५९ तलावांची नोंद आहे. तुमसर तालुक्यातील आष्टी गावात ५८ माजी मालगुजारी तलावांची नोंद आहे. प्रत्यक्षात या गावात केवळ १४ तलाव शिल्लक आहेत. आष्टी येथील मामा तलावाचे खोलीकरण महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरु आहे. जिल्हा परिषदेने हा तलाव मच्छिंद्र मत्स्यपालन सहकारी संस्था, आष्टी या संस्थेला पाच वर्षाकरिता मासेमारीकरीता कंत्राटासाठी दिला आहे. तलावाचे क्षेत्रफळ ७.३१ हेक्टर आहे. येथे केवळ एक हेक्टरमध्ये पाणी असतो. सन १९८० च्या रेकॉर्डनुसार हा तलाव २३ हेक्टरमध्ये असल्याची नोंद आहे.
जिल्हा परिषदेने आतापर्यंत तलावाचे खोलीकरण करण्याची तसदी घेतली नव्हती. तलावाचे खोलीकरण न झाल्याने तलाव परिसरातील शेतकऱ्यांनी शेतीचा विस्तार करून तलावात अतिक्रमण केले. त्या खोलीकरणाला शेतकऱ्यांनी विरोध केला. तलावाचे खोलीकरण झाले असते तर पाण्याची पातळी वाढून त्याचा सिंचनाकरिता लाभ झाला असता. या तलावाची लीज (भाडेतत्व) जिल्हा परिषदेमार्फत नियमित घेतली जात असल्यामुळे हा प्रकार मच्छिंद्र मत्स्यपालन सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन तलाव खोलीकरणाची मागणी केली असता हा विषय ग्रामपंचायतीचा असून स्थानिक स्तरावर प्रश्न निकाली काढण्यासाठी सांगितले.
उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर
तलावाच्या शेजारी शेतजमीन करणाऱ्या शेतकऱ्यांनी पाणी वापर सहकारी संस्था सुरु केल्या आहेत. याच संस्थेचे पदाधिकारी तलावावर अतिक्रमण करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. जिल्ह्यात मासेमारी उद्योग नावापुरतेच शिल्लक आहे. दीड लक्ष मासेमार बांधवांची लोकसंख्या असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
चौकशी करण्याची मागणी
यासंदर्भात मच्छिंद्र मत्स्यपालन संस्थेने तुमसर येथील भूमापन कार्यालयाकडे ७,५०० रुपये भरुन तलावाची मोजणी करण्यासाठी अर्ज केला. अधिकाऱ्यांनी तलावस्थळी येऊन तलावाचे मोजमाप न करता शेजारील शेतीचे मोजमाप करून तलावाची सीमा आखून दिली. तीन बाजूंनी तलावाची नवीन पाळ अस्तित्वात येत असून तलावालगतच्या शेतकऱ्यांना १० एकरावर जागा मिळाली आहे. यात भूमी अभिलेख कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी चुकीचे मोजमाप केले असून याप्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी संस्थेचे अध्यक्ष राजकुमार केवट, आनंद भुरे, संजय मोहनकर आणि संजय केवट यांनी केली आहे. तसे न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा मत्स्यपालन सहकारी संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.