233 केंद्रांना परवानगी मात्र धान खरेदीचा पत्ता नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2022 10:54 PM2022-11-10T22:54:51+5:302022-11-10T22:55:44+5:30
दरवर्षी खरीप हंगामातील धान खरेदी दिवाळीच्या सुरुवातीला प्रारंभ हाेते. मात्र यंदा दिवाळी हाेऊन दाेन आठवडे झाले तरी अद्याप जिल्ह्यात कुठेही धान खरेदीला प्रारंभ झाला नाही. सुरुवातीला जिल्ह्यात ४६ धान खरेदी केंद्रांना परवानगी देण्यात आली हाेती. त्यानंतर गुरुवारी मागील हंगामात काम करणाऱ्या १८३ व नवीन ५० अश्या जिल्ह्यात एकूण २३३ संस्थांना धान खरेदी व नाेंदणीची मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आधारभूत किंमत धान खरेदी याेजनेंतर्गत जिल्ह्यात २३३ खरेदी केंद्रांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र अद्यापही धान खरेदीचा पत्ता नाही. परिणामी शेतकऱ्यांना धान खरेदीसाठी व्यापाऱ्याच्या दारात जावे लागत आहे. ऑनलाइन नाेंदणीची मुदत ३० नाेव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आता शेतकऱ्यांच्या नजरा प्रत्यक्ष धान खरेदी केव्हा सुरू हाेणार याकडे लागले आहे.
दरवर्षी खरीप हंगामातील धान खरेदी दिवाळीच्या सुरुवातीला प्रारंभ हाेते. मात्र यंदा दिवाळी हाेऊन दाेन आठवडे झाले तरी अद्याप जिल्ह्यात कुठेही धान खरेदीला प्रारंभ झाला नाही. सुरुवातीला जिल्ह्यात ४६ धान खरेदी केंद्रांना परवानगी देण्यात आली हाेती. त्यानंतर गुरुवारी मागील हंगामात काम करणाऱ्या १८३ व नवीन ५० अश्या जिल्ह्यात एकूण २३३ संस्थांना धान खरेदी व नाेंदणीची मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.
मात्र प्रत्यक्षात जिल्ह्यातील एकाही केंद्रावर अद्याप धान खरेदी सुरू झाली नाही. शेतकरी अडचणीमुळे आपला धान १४०० ते १५०० रुपये प्रती क्विंटल दराने व्यापाऱ्यांना धान विकत आहे. यात शेतकऱ्यांना सुमारे ५०० ते ६०० रुपयांचा आर्थिक फटका बसत आहे. प्रत्यक्ष धान खरेदी केव्हा सुरू हाेईल, हे मात्र निश्चित कुणीही सांगत नाही.
शेतकऱ्यांना धान खरेदी केंद्र सुरु हाेण्याची प्रचंड उत्सुकता लागली आहे. मात्र सध्यातरी एकाही केंद्रावर खरेदी सुरु झालेली नाही.
२० केंद्रांची मान्यता रद्द
- धान खरेदीमध्ये माेठ्या प्रमाणात गैरप्रकार व अनियमितेचा प्रकार उघडकीस आला हाेता. अवघ्या सहा तासात सहा लाख क्विंटल धान खरेदीचा विक्रम केंद्रांवर करण्यात आला हाेता. या प्रकाराची चाैकशी करण्यात आली. त्यातील आता २० केंद्रांची मान्यता रद्द करण्यात आली असून अशा संस्थांना प्रत्येकी २० लाख रुपये दंड ठाेठावण्यात आला आहे. दंडाची पूर्तता केल्यास संबंधित धान खरेदी सुरू करण्याची परवानगी देण्यात येणार आहे.
नाेंदणीसाठी ३० नाेव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
- आधारभूत किंमत खरेदी अंतर्गत धान विक्रीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नाेंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नाेंदणीची अंतिम मुदत १० नाेव्हेंबर हाेती. गुरुवारपर्यंत ७१ हजार शेतकऱ्यांनी नाेंदणी झाली हाेती. तब्बल दाेन लाख २३ हजार १०१ शेतकरी धान उत्पादक आहेत. अद्यापही माेठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची नाेंदणी व्हायची आहे. त्यामुळे आता नाेंदणीला ३० नाेव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच ऑनलाइन नाेंदणीसाठी ॲपही विकसित करण्यात आला आहे.