क्रिकेटच्या वादात २४ वर्षीय तरुणाचा खून, चिखली येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 06:13 PM2023-11-06T18:13:44+5:302023-11-06T18:14:17+5:30
क्रिकेटच्या बॅटने केला डोक्यावर प्रहार, जागीच झाला गतप्राण
अड्याळ (भंडारा) : क्रिकेट मॅच हरल्यावर ती पुन्हा एकदा खेळली जावी, या कारणावरून उद्भवलेल्या वादात २१ वर्षीय तरुणाने क्रिकेटच्या बॅटने २४ वर्षीय तरुणाच्या डोक्यावर प्रहार केला. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. निवृत्तिनाथ गोपीचंद कावळे, रा. चिखली असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना अड्याळ पोलिस ठाणे हद्दीत येत असणाऱ्या चिखली येथील क्रिकेट ग्राउंडवर रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.
याप्रकरणी पोलिसांनी करण रामकृष्ण बिलवणे, रा. चिखली याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करीत अटक केली. माहितीनुसार चिखली येथील क्रिकेट ग्राउंडवर रविवारी दोन चमूंमध्ये क्रिकेट मॅच खेळली गेली. यावेळी एका संघाचा पराभव झाला. यात हीच मॅच पुन्हा एकदा खेळली जावी, या कारणावरून दोन्ही चमूंमध्ये वाद झाला. यात रागाच्या भरात करण रामकृष्ण बिलवणे या तरुणाने आधी हातात असलेल्या क्रिकेटच्या बॅटने निवृत्तिनाथ याच्या पायावर मारले व नंतर डोक्याच्या मागील भागात प्रहार केला. यात निवृत्तिनाथ हा खाली कोसळला.
सोबत असणाऱ्या अन्य तरुणांनी त्याला तत्काळ अड्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. येथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच अड्याळ पोलिसांनी करण बिलवणे याला ताब्यात घेतले. घटनास्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी, पवनीचे उपविभागीय पोलिस अधिकारी तथा अड्याळ पोलिस ठाण्याचे ठाणेदार व अन्य कर्मचाऱ्यांनी भेट दिली. करण बिलवणे याच्याविरुद्ध भांदविच्या ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्रिकेटच्या वादात नाहकच २४ वर्षीय निवृत्तिनाथचा जीव गेला. या घटनेने गावात शोककळा पसरली. सायंकाळी ६:३० वाजताच्या सुमारास निवृत्तिनाथच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
निवृत्तिनाथ झाला होता वनविभाग भरतीत यशस्वी
सन २०१९ पासून अड्याळ येथील अभ्यासिकेत अभ्यास करून २०२३ वनविभाग भरतीत निवृत्तिनाथ यशस्वी झाला होता. फिजिकलसाठी सराव सुरू होता. तो पार्ट टाइम रोजगार म्हणून फोटोग्राफी व्यवसाय करायचा. विशेष म्हणजे गावात राहत नव्हता, परंतु रविवार दिवस असल्याने गावातीलच मित्रांसोबत दुपारी मॅच खेळायला गेला आणि येथेच त्याचा अंत झाला.