विषबाधा झालेल्या २४० रुग्णांना उपचारानंतर सुटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 06:00 AM2020-02-28T06:00:00+5:302020-02-28T06:00:15+5:30
अन्नातून विषबाधा झाल्याने माहित होताच तालुका, जिल्हा आरोग्य यंत्रणा तात्काळ झरप येथे दाखल झाली. शासकीय आणि खासगी वाहनातून रुग्णांना रुग्णालयात नेण्यात आले. गुरुवारी सर्व रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. घरोघरी आरोग्यदूत पाठवून तपासणी केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर (चौ.) : हळदी कार्यक्रमाच्या भोजनातून तब्बल २४० जणांना विषबाधा होण्याचा प्रकार बुधवारी लाखनी तालुक्यातील झरप येथे उघडकीस आला होता. या सर्वांवर मुरमाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि गावात शिबिर लावून उपचार करण्यात आले. आता सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असून रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
झरप येथील जयराम कोरे यांच्या मुलीच्या लग्नानिमित्त हळदीच्या भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण गाव तेथे भोजनासाठी आले होते. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळपासून अनेकांना उलटी व पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. बुधवारी दुपारपर्यंत ७० जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र रात्री अनेकांची प्रकृती बिघडल्याने त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. झरप येथील तब्बल २४० जणांना अन्नातून विषबाधा झाल्याचे पुढे आले. या सर्वांवर उपचार करण्यात आले असून सर्वांची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
अन्नातून विषबाधा झाल्याने माहित होताच तालुका, जिल्हा आरोग्य यंत्रणा तात्काळ झरप येथे दाखल झाली. शासकीय आणि खासगी वाहनातून रुग्णांना रुग्णालयात नेण्यात आले. गुरुवारी सर्व रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. घरोघरी आरोग्यदूत पाठवून तपासणी केली जात आहे. झरप येथे लावण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात ४० जणांवर उपचार करण्यात आल्याची माहिती मुरमाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ.अर्चना तलमले यांनी सांगितले. दरम्यान अन्न व औषध प्रशासन विभागाच्या चमूनेही भेट दिली. त्यांनी अन्न व पाण्याचे नमूने ताब्यात घेतले.
दरम्यान या घटनेने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गावातील सामाजिक कार्यकर्ते मधुकर कोरे यांनी प्रयत्न करून सर्व बाधीतांना मुरमाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केले. बुधवारची रात्र झरपवासीयांसाठी संकटाची रात्र ठरली.
शिजलेले अन्न तीन तासात संपवावे
शिजलेले अन्न अधिक वेळपर्यंत न ठेवता किमान तीन चार तासात संपेल अशी व्यवस्था असणे महत्वाचे आहे. पिण्याचे पाणी निर्जंतूकीकरण करून प्राशन करावे. शुद्ध पाण्याचा नियमित वापर करावा असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. झरपला आरोग्य शिबिरातून सेवा पुरविण्यात आली होती. सर्व रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे त्यांनी सांगितले.