जिल्ह्यातील २४९ दूग्ध संस्था अवसायानात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 04:47 PM2024-05-27T16:47:33+5:302024-05-27T16:47:56+5:30
दूध संकलनात खासगी संस्था वरचढ : जिल्ह्यात २८६ संस्था सुरू
भंडारा : खाजगी दूध संकलकांचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारल्यामुळे जिल्ह्यातील सहकारी दूध संस्था अडचणीत आल्या आहेत. अशा संस्थांवर अवसायक नेमण्याची नामुष्की ओढावली आहे. जिल्ह्यातील २४९ संस्था अवसायनात निघाल्या आहेत. सध्यस्थितीत जिल्ह्यात सुरु असलेल्या २४९ संस्थांच्या माध्यमातून मार्च महिन्यात २ लाख ७० हजार २१५ लिटरवर येऊन ठेपले आहे.
काही दशकांपूर्वी जिल्ह्यात सहकारी दूध संस्थांचे जाळे भक्कम होते. प्रतिदिन लाखो लिटर दूध संकलन या संस्थांद्वारे केले जात होते. या संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित साधले जात असे. मध्यंतरीच्या काळात या व्यवसायात खाजगी संकलकांनी उडी घेतली. गावोगावी संकलन केंद्र सुरू केली. दूध उत्पादक शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी सहकारी संस्थांपेक्षा जास्त दर दिला जाऊ लागला. त्यामुळे शेतकरी खाजगी संकलन केंद्राकडे वळले. आणि याचाच फटका सहकारी दूध संस्थांना बसला. दूध संकलन जसजसे कमी-कमी होत गेले त्यानुसार संस्थांही अडचणीत येऊ लागल्या. आजघडीला जिल्हाभरातील थोड्याथोडक्या नव्हे, तर तब्बल २४९ सहकारी संस्था अवसायनात काढण्यात आले आहे.
मार्च २०२४ ची आकडेवारी पाहता एकूण २ लाख ७० हजार २१५ लिटर दुध संकलन करण्यात आले. खासगी केंद्रामध्ये जैन ४७,७४०, जर्सी केंद्र ४,०४६, बन्सी १४,५००, एसव्हीके ३०,४३३, राहुल ७,०२६, अग्रवाल ५३००, अतुल १४,०२०, दडवी ९८०० व लोकमंगल ३०१०, असे एकूण २ लाख २३ हजार ६८७ लिटर दुध खासगी केंद्रात संकलीत झाले आहे. तर भंडारा दुग्ध संघाचे ४६ हजार ५२४ लिटर दूध संकलन झाले आहे. दूध संघाच्या तुलनेत जिल्ह्यातील शेतकरी खाजगी संकलन केंद्रांकडे अधिक वळल्याचे दिसून येत आहेत.
गतवर्षीच्या तुलनेत दूध संकलनात वाढ
जिल्ह्यातील खासगी प्रकल्प व सहकार संघाच्या माध्यमातून २०२३-२४ मध्ये प्रतीदिन २ लाख ५२ हजार ९६८ लिटर दूध संकलन करण्यात आले. तर २०२२-२३ मध्ये २ लाख ३८ हजार ७८२ लिटर दूध संकलन झाले होते. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी १४ हजार १८६ लिटरने वाढ झाली आहे.
शासनाने मदत देण्याची गरज
चांगले शिक्षण घेऊनही बेरोजगार असल्याने तरुणांच्या मदतीने शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळत आहेत. बेरोजगार मुलांच्या हाताला काम मिळेल त्यातून चार पैसे उभे राहतील आणि मुलांच्या लग्नासाठीचा मार्गही मोकळा होईल. या भाबड्या आशेने बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाचा पर्याय निवडला आहे; परंतु मागील काही दिवसांपासून शासनाने दुधाचे भाव कमी केले आहेत. यामुळे दूध व्यवसाय करणे परवडत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.