डिजिटल शिक्षणावर २५ टक्के निधीचा वापर
By admin | Published: April 3, 2017 12:31 AM2017-04-03T00:31:58+5:302017-04-03T00:31:58+5:30
आजची शिक्षण प्रणाली भविष्यातील भक्कम पाया उभारु शकत नाही. आजचे विद्यार्थी उद्याची गुंतवणूक आहे.
पत्रपरिषद : नाना पटोले यांची माहिती, भंडारा शहरातून होणार उड्डाणपूल
भंडारा : आजची शिक्षण प्रणाली भविष्यातील भक्कम पाया उभारु शकत नाही. आजचे विद्यार्थी उद्याची गुंतवणूक आहे. त्यामुळे डिजिटल शिक्षण प्रणालीचा योग्य उपयोग करुन सशक्त तंत्रज्ञानयुक्त तरुण पिढी निर्माण करण्यावर भर देण्यासाठी आमचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी चौदाव्या वित्त आयोगांतर्गत मिळालेल्या निधीचा २५ टक्के वापर शिक्षणावर करण्यात येणार असल्याची माहिती खासदार नाना पटोले यांनी दिली.
रविवारी दुपारी ३ वाजता येथील विश्रामगृहात आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. खा. पटोले म्हणाले भंडारा जिल्ह्यात गुणवंतांची खाण आहे.मात्र शैक्षणिक पिढी घडवित असताना आधुनिक क्षेत्रात स्वत:च्या पायावर उभे होवून स्वावलंबी होणे अत्यंत गरजेचे आहे. बेरोजगारीवर हाच खरा उपाय आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका शाळांमधूनही उत्कृष्ट शिक्षण देत असताना डिजीटल क्रांतीचा सगळ्यात खालच्या स्तरातील विद्यार्थ्यांनाही त्याचा लाभ होतो आहे का? हे चाचपडून पाहणे ही अत्यंत गरजेचे आहे.
सिंचन सुविधांबाबत बोलताना खा. पटोले म्हणाले, येत्या काही महिन्यात भंडारा जिल्ह्यात ६० टक्के सिंचन व्यवस्था निर्माण होणार आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या प्रस्तावित बांधकाम करण्याची टेंडर प्रक्रिया येत्या सहा महिन्यात पूण करण्यात येईल.
यात भंडारा शहरा बाहेरून बायपास मार्ग न काढता शहरातूनच उड्डाणपुलाचे बांधकाम होणार आहे. राष्ट्रीय प्रकल्प असलेल्या गोसेखुर्द प्रकल्पाअंतर्गत पुर्नवसनाची कामे धडाक्यात सुरु करण्यात आली आहे. कार्य पुर्ण करण्यासाठी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार की नाही? हे तुर्तास सांगणे कठीण असले तरी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कर्जमाफी करण्याची विनंती करण्यात आली आहे.
पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना खा. पटोले म्हणाले, पत्रकारिता क्षेत्रात बातम्यांच्या माध्यमातून कलंक लावण्यावर अंकूश लावणे अत्यंत गरजेचे आहे. वेळप्रसंगी अशांवर मानहानीचा दावाही करावा लागेल, तर मागेपुढे पाहणार नाही, असेही ते म्हणाले. पत्रपरिषदेला नगरसेवक नितीन धकाते, विकास मदनकर, आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
विशी येथे विद्यार्थी-पालक संमेलन
डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तर ते शहरी भागापर्यंत लोकसहभागातून शाळांचा दर्जा शिक्षण, गुणवत्ता व शैक्षणिक संपूर्णत: बाबत कसा श्रेष्ठ करता येईल यावरही भर देण्यात येणार आहे. यासाठी साकोली तालुक्यातील विर्शी येथे १८ एप्रिलला डिजिटल शिक्षण प्रणालीवर शिक्षक, विद्यार्थी व पालकांच्या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.