पाणी...देता का पाणी... २१ गावांतील २५ हजार नागरिक तहानलेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2022 02:39 PM2022-04-04T14:39:11+5:302022-04-04T14:46:19+5:30
सध्या प्रत्येक गावाची लोकसंख्या वाढलेली असून चाळीस वर्षांपेक्षा जास्त काळ झाला तरी जिल्हा परिषदेने अजूनपर्यंत फिल्टर प्लांट लावलेला नाही तसेच या योजनेचे नूतनीकरण केले नाही.
मोहन भोयर
तुमसर (भंडारा) : बावनथडीच्या पाथरीघाट येथे गोबरवाही ग्रामीण प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सन १९८० मध्ये सुरू करण्यात आली. तेव्हापासून भंडारा जिल्हा परिषदतर्फे सदर योजना सुरू आहे, परंतु आदिवासीबहुल अनेक गावांत या योजनेच्या अंतर्गत पाणी मिळत नाही. त्यामुळे त्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. सुमारे २१ गावांतील २५ हजार नागरिक अद्याप तहानलेले असून प्रशासनाविरुद्ध त्यांच्यात रोष दिसत आहे. कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना पूर्ण क्षमतेने येथे सुरू झाली नसून मागील चार दशकांपासून त्यांना अद्यापही पाण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे.
परिसरातील पाणीपुरवठा योजनेत नाका डोंगरी, चिखला, सीता सावंगी व गोबरवाही या चार गावांचा नव्या योजनेत समावेश होता. त्यानंतर राजापूर, सुंदर टोला, पवनारखारी, हमेशा, गणेशपूर या गावांनाही येथील जलकुंभातून पाणी वितरित करण्यात येत होते. चार गावांकरिता असलेले नळ योजना सध्या सात गावांना पाणीपुरवठा करीत आहे.
सध्या प्रत्येक गावाची लोकसंख्या वाढलेली असून चाळीस वर्षांपेक्षा जास्त काळ झाला तरी जिल्हा परिषदेने अजूनपर्यंत फिल्टर प्लांट लावलेला नाही तसेच या योजनेचे नूतनीकरण केले नाही. त्यामुळे पावसाळा असो की हिवाळा येथील ग्रामस्थांना आठवड्यातून केवळ चार दिवसच केवळ एक वेळ पाणी मिळत आहे. पाणी कर हा वर्षभर घेतला जातो. केवळ चार ते पाच गावांना दोन ते तीन महिने या पाणी पुरवठा योजनेतून पाणी मिळाले. इतर गावांना पाणी पोचू शकले नाही. मागील चार वर्षांपासून ही योजना बंद पडली आहे. काही महिन्यापूर्वी खासदारांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाने दिशा समितीची बैठक घेतली होती. सदर बैठकीत सेवानिवृत्त खंडविकास अधिकारी डॉ. शांताराम चाफले यांनी सदर योजनेच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.
मूलभूत सोयीसुविधांचा अभाव
आदिवासीबहुल असलेल्या परिसरात भूषण जलसंकट निर्माण होत असताना अजूनपर्यंत प्रशासनाने कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेला गती दिलेले नाही. त्यामुळे उन्हाळ्यात येथील नागरिकांना रात्री जीव धोक्यात घालून शेतावरील विहिरीतून पाणी आणावे लागते. गाव खेड्यातील महिला रणरणत्या उन्हातही दिवसा पाणी आणताना दिसतात. स्थानिक स्वराज्य संस्थेचे मुख्य कार्य हे नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देणे असले तरी मात्र येथे तसे होताना दिसत नाही.