करडी परिसरात २५१ पॉझिटिव्ह,तर १० जणांनी गमावले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:33 AM2021-04-13T04:33:23+5:302021-04-13T04:33:23+5:30
करडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील करडी परिसरातील २५ गावात लॉकडाऊन असला तरी कोरोनाचा संसर्ग वाढता आहे. शासनाच्या आदेशानुसार प्राथमिक ...
करडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील करडी परिसरातील २५ गावात लॉकडाऊन असला तरी कोरोनाचा संसर्ग वाढता आहे. शासनाच्या आदेशानुसार प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत सहा उपकेंद्रात ८ मार्चपासून कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड लसीचे दोन टप्प्यात ४,३९७ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. तर ९४ शिबिराचे माध्यमातून ९ एप्रिलपर्यंत २,९०० नागरिकांची अँटीजेन तपासणी करण्यात आली. तपासणीत २५१ रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. आतापर्यंत १० जणांनी कोरोनामुळे प्राण गमाविले आहे.
करडी परिसरातील ३५ हजार लोकसंख्येसाठी एकमेव प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. केंद्रापासून भंडारा व तुमसर, साकोली शहराचे अंतर २५ ते ३० किमीचे असल्याने नागरिकांना आरोग्य सुविधेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवलंबून राहावे लागते. शासनाच्या वतीने कोराेनावर प्रतिबंधात्मक उपचार म्हणून लसीकरणास प्रारंभ करण्यात आले. करडी परिसरात कोव्हॅक्सिनचा पहिला डोस ८ मार्चपासून सुरू करण्यात आला. आतापर्यंत नऊ टप्प्यात परिसरातील उपकेंद्र व केंद्रस्तरावर २,५४३ नागरिकांना कोव्हॅक्सिनचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला. यात १,०७० पुरूष तर १,४७२ महिलांचा समावेश आहे. यात महिला आघाडीवर आहेत. केंद्र व उपकेंद्र स्तरावर कोविशिल्ड लसीचे लसीकरण करण्यात आले. आतापर्यंत १,८५४ नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला. यात ८३४ पुरूष तर १,०१० स्त्रियांचा समावेश आहे.
आरोग्य केंद्र व उपकेंद्रात कर्मचाऱ्यांचे पद रिक्त
कोरोना महामारी सतत वाढत असून जीवघेणी ठरली असल्याने आरोग्य विभागावर कामाचा ताण वाढला आहे. केंद्रांतर्गत पालोरा, जांभोरा, करडी, निलज, मुंढरी, देव्हाडा आदीसह उपकेंद्र असून लसीकरण, ॲंटीजेन तपासणी तसेच इतर तपासण्या करण्याकरिता मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. केंद्रात ३ आरोग्य सेवकांच्या जागा रिक्त आहेत. तसेच सहा उपकेंद्रावर ६ नर्सेसची पदे रिक्त आहेत. त्यामुळे शासनाने आरोग्य सेवेचा प्रश्न गांभीर्याने सोडविण्याची गरज आहे .
लसींच्या तुटवड्याने लसीकरण बंद
परिसरात कोरोना लसीकरणाचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. तीन दिवसांपासून कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लस संपल्याने लसीकरण बंद पडले आहे. शासन-प्रशासनाकडून लस उपलब्धतेसाठी उशीर झाल्याने लसीकरण थांबविण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगितले जात आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून व्हॅक्सिनसाठी नागरिकांना
वाट पाहावी लागत आहे.
बॉक्स
आरोग्य केंद्रात नागरिकांसाठी पर्याप्त औषधसाठा उपलब्ध असून नागरिकांनी न घाबरता आरोग्य केंद्र व उपकेंद्रात येऊन लसीकरण तसेच अँटीजेन तपासणी व आरोग्य संबंधित इतर आवश्यक तपासण्या वेळेत कराव्या.
डॉ. पी.जी तलमले, वैद्यकीय अधिकारी करडी,