जिल्ह्यात २६ टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली; टीव्ही, फ्रीज, बाइक तरी मोफत रेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:37 AM2021-07-30T04:37:21+5:302021-07-30T04:37:21+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क भंडारा : कोरोना संक्रमण काळात सर्वांनाच धान्य मिळावे यासाठी राज्य व केंद्र सरकारने कंबर कसली होती. ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना संक्रमण काळात सर्वांनाच धान्य मिळावे यासाठी राज्य व केंद्र सरकारने कंबर कसली होती. मात्र यातही बीपीएलधारकांना कुठलाही त्रास होऊ नये याची खबरदारी घेण्यात आली होती. जिल्ह्यात २६ टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत. अनेक बीपीएल कार्डधारकांनामध्ये श्रीमंतांचा भरणा असल्याचे दिसून आले आहे. टीव्ही, फ्रीज, बाइक यासह अन्य भौतिक सुविधा घरी असतानाही त्यांना मोफतचे रेशन मिळत आहे. किंबहुना सगळीच कुटुंब तसे नाहीत हातावर कमविणे व पानावर खाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. मात्र त्यांच्या भाग्यातले रेशन त्यांना मिळत नसल्याची ही खंत व्यक्त होत आहे. जिल्हा पुरवठा विभागाने यादीतील दोष दूर करून खऱ्या लाभार्थींना रेशन उपलब्ध करून देण्याची मागणी आहे.
दारिद्र्यरेषेखालील लोकांचा आढावाच घेतला नाही
जिल्ह्यात २६ टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली असल्याचे कार्डधारकांवरून समजते. मात्र अनेकांकडे टीव्ही, फ्रीज, बाइक अशा सुविधा आहेत. खर्या अर्थाने दारिद्र्यरेषेखालील लोकांचा आढावा घेण्यात आलेला नाही, याकडे लक्ष देण्यात येत नसल्यामुळे त्यामुळे ही समस्या उद्भवत आहे.
कोण गरीब, कोण श्रीमंत?
जिल्ह्यात ६५ हजार ३९० बीपीएलकार्डधारकांची संख्या आहे. मात्र यापैकी अनेकांकडे सोयी-सुविधा असल्यानंतर कोण गरीब, कोण श्रीमंत हा फरक दिसून येत नाही. अत्यंत गरीब गरजू लाभार्थींना त्यांना हक्काचे रेशन मिळणे दुरापास्त होत आहे. एकीकडे पाॅस मशीनवर धान्य वितरित करायचे आहे. दुसरीकडे यादीमध्ये गोंधळ असल्याने खऱ्या लाभार्थींची ओळख लपलेली आहे. त्यामुळे कोण गरीब आणि कोण श्रीमंत, असा प्रश्न आपसूकच निर्माण होत आहे.
जिल्ह्यात दारिद्र्यरेषेखालील लोकांची संख्या अधिक असतानाही त्यांना त्या प्रमाणात सोयी-सुविधा मिळत नाहीत. आजही अनेकांना नि:शुल्क रेशन घरकुल व अन्य शासकीय योजनांपासून वंचित आहेत. खऱ्या लाभार्थींचा शोध घेऊन त्यांना योजनेचा लाभ देण्याची खरी गरज आहे. जिल्हा पुरवठा कार्यालय असो की तहसील कार्यालयातील अन्न व पुरवठा विभाग कधीच दिलेल्या कार्डाची परत शहानिशा करीत नाही. नूतनीकरण झाले की हात वर करण्यात आले.
दारिद्र्यरेषेखालीसाठीचे निकष काय?
n जिल्ह्यात ६५ हजारपेक्षा जास्त दारिद्र्यरेषेखालील कार्डधारक आहेत. ज्यांच्याकडे स्वतःचे घर किंवा त्यांचे उत्पन्न अत्यल्प आहे अशांना महसूल प्रशासन बीपीएल कार्ड देत असते. लाभार्थींनी केलेल्या अर्जानुसार व सर्वेक्षणाअंती हे कार्ड दिले जाते. मात्र काही श्रीमंतांनी पैशाच्या भरोशावर बीपीएल कार्ड प्राप्त केले आहे. त्यामुळे दारिद्र्यरेषेखालील कार्ड प्राप्त करणे यामागे निकष व उद्दिष्टाला हरताळ फासण्यात आला आहे.