तीन होम क्वारंटाईनसह २७ जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 05:00 AM2020-04-02T05:00:00+5:302020-04-02T05:00:24+5:30
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाऊन असताना रस्त्यावर फिरणाºया तीन होम क्वारंटाईन व्यक्तींसह २७ जणांवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणतेही कारण नसताना जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचा भंग करून ही मंडळी रस्त्यावर फिरताना आढळून आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाऊन असताना रस्त्यावर फिरणाºया तीन होम क्वारंटाईन व्यक्तींसह २७ जणांवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणतेही कारण नसताना जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचा भंग करून ही मंडळी रस्त्यावर फिरताना आढळून आली.
भंडारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. विविध महानगरातून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला. मात्र त्यानंतरही पवनी तालुक्यातील सोमनाळा बु. येथील श्रीधर श्रीपाद नंदापुरे (३२), साकोली लगतच्या सेंदूरवाफा येथील राजू दिलीप तलमले आणि साकोली तालुक्यातीलच पाथरी येथील खुशाल रामदास वलथरे (२८) हे होम क्वारंटाईन व्यक्ती रस्त्यावर फिरताना आढळून आले. त्यांच्याविरुद्ध अड्याळ आणि साकोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जिल्हाधिकाऱ्यांच्या संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पवनी येथील सिंधी कॉलनीतील विशाल दुर्योधन मंडपे (२५), लाखांदूर तालुक्यातील तावशी येथील नरेंद्र मोनाजी फुंडे (२८), खेमराज माधव उपरीकर (३०), श्रावण तुळशीराम डोंगरवार (४२), खेमचंद श्रीपाद वाघाडे (३०), देवचंद वलीराम सोनवाने (३१), जगदीश कवडू वलथरे (३८), दिनेश नारायण सूर्यवंशी (२४), विलास मुखडन सूर्यवंशी (४०), जगदीश कुणाल वाघाडे (३२), लोकराम शिवा सोनवाने (३८), संदीप दयाराम भुसारी (२४), विलास देवराम फुंडे (३८), चेतन ताराचंद रामटेके (२६), मोहाडी तालुक्यातील आंधळगाव येथील राजेश सोमाजी निपाने, गौतम गोपाळा मेश्राम, तुमसर येथील स्वप्नील सुनील भिवगडे, सुकळी देव्हाडी येथील अंकुश गुलाब राऊत, खापा येथील सोपान सुरेश शेंडे (३२), मांगली येथील लोकेश शंकर पुंडे (२५), पिंपरी येथील ईश्वर नारबा बडवाईक (२८), परसवाडा येथील गज्जू भिक्षूक ठवकर आणि विलास मोहन कांबळे यांच्याविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनाई आदेश असताना यातील अनेक जण वाहनाद्वारे भटकताना पोलिसांना आढळून आले.
त्यांना बाहेर निघण्याचे कारण विचारले असता समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भेंडाळा येथे खर्रा विक्रेत्यावर कारवाई
संचारबंदीच्या काळात किराणा दुकानात खर्रा विक्री करणाºया पवनी तालुक्यातील भेंडाळा येथील एका इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेमराज जगन्नाथ वैद्य (४५) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. तो भेंडाळा येथील आपल्या शिवशक्ती किराणा दुकानात खर्रा विकत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यावरुन पोलिसांनी धाड टाकली असता तेथे खर्रा घोटण्याची पाटी, कापड व इतर साहित्य जप्त करण्यात आले. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.
परवाना असेल तरच दुचाकी चालवा
भंडारा शहरात रस्त्यावर नाहक फिरणाऱ्यांवर जरब बसविण्यासाठी आता पोलिसांनी वाहन चालविण्याचे लायसन्स तपासण्याची मोहीम हाती घेतली. येथील राजीव गांधी चौकात सकाळी येणाऱ्या प्रत्येक दुचाकी व चारचाकी वाहनचालकाला ओळखपत्रासोबतच वाहन चालविण्याचे लायसन्स आहे काय याची विचारणा करीत होते. ज्यांच्याकडे लायसन्स आढळून आले नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पोलिसांची ही युक्ती चांगलीच उपयुक्त ठरली असून अनेकांनी रस्ता बदलून तेथून धूम ठोकली.
हॉस्पीटल क्वारंटाईनमधून १४ जणांना सुटी
येथील नर्सिंग वसतिगृहाच्या विलगीकरण कक्षात दाखल असलेल्यांपैकी १४ व्यक्तींना बुधवारी सुटी देण्यात आली आहे. सध्या येथे १५ व्यक्ती दाखल असून घरात विलगीकरण केलेल्या व्यक्तींची संख्या २३ आहे. जिल्ह्यात अद्यापपर्यंत कोरोनाबाधीत रुग्ण आढळला नाही.