धानक्षेत्रात यंदा 27 हजार हेक्टर वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 05:00 AM2021-06-18T05:00:00+5:302021-06-18T05:00:02+5:30
भंडारा जिल्हा हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. धानाचे कोठार म्हणून जिल्ह्याची ओळख आहे. नामवंत जातीचा तांदूळ येथे प्रसिद्ध आहे. जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र तीन लाख ४२ हजार ३०० हेक्टर असून, लागवडीलायक क्षेत्र दोन लाख सात हजार हेक्टर आहे. एक लाख ९१ हजार ६६४ हेक्टरवर गतवर्षी सर्व पिकांची लागवड झाली होती. जिल्ह्यात सरासरी १३३० मिमी पाऊस होतो.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : नैसर्गिक संकटाचा कितीही सामना करावा लागला तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढे धानपिकाशिवाय पर्याय नाही. विविध पिकांचे प्रयोग केल्यानंतरही शेतकरी काहीही झाले तरी धानाचीच निवड करीत असल्याचे दिसते. यंदा तर धानाच्या क्षेत्रात गतवर्षीपेक्षा २७ हजार हेक्टरने वाढ होणार आहे. गतवर्षी एक लाख ८७ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली होती. यावर्षी दोन लाख १४ हजार हेक्टरवर धान लागवडीचे नियोजन आहे.
भंडारा जिल्हा हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. धानाचे कोठार म्हणून जिल्ह्याची ओळख आहे. नामवंत जातीचा तांदूळ येथे प्रसिद्ध आहे. जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र तीन लाख ४२ हजार ३०० हेक्टर असून, लागवडीलायक क्षेत्र दोन लाख सात हजार हेक्टर आहे. एक लाख ९१ हजार ६६४ हेक्टरवर गतवर्षी सर्व पिकांची लागवड झाली होती. जिल्ह्यात सरासरी १३३० मिमी पाऊस होतो. भातपिकाचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख ८० हजार हेक्टर असून, यावर्षी यात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसत आहे. धानपिकातून गत काही वर्षात शेतकऱ्यांच्या हातात काहीही उरत नाही. धान लागवडीपासून ते काढणीपर्यंत विविध समस्या आणि नैसर्गिक प्रकोपाचा सामना करावा लागतो. विक्रीसाठीही शेतकऱ्यांना प्रचंड कष्ट घ्यावे लागतात. पणन महासंघ धानाची खरेदी करीत असले तरी वेळेवर पैसे मिळेल याची कोणतीही खात्री नसते. अनेक संकटे येऊनही शेतकरी मात्र दरवर्षी खरीप हंगाम आला की धानाचा विचार करताना दिसतो. अलीकडे भाजीपाला, सोयबीन, तूर पिकाचे क्षेत्र वाढत असले तरी शेतकऱ्यांचा कल मात्र परंपरागत धानपिकाकडे दिसून येतो.
कृषी विभागाच्या नियोजनानुसार जिल्ह्यात दोन लाख २७ हजार ९१ हेक्टरवर पिकांची लागवड होणार आहे. त्यात भातपिकाचे क्षेत्र दोन लाख १३ हजार ८३७ हेक्टर, तूर ११ हजार ८५४ हेक्टर, सोयाबीन ६०० हेक्टर आणि कापूस ८०० हेक्टरवर लागवड केली जाणार आहे. शेतकरी सध्या मशागतीच्या कामात व्यस्त असून, नर्सरी तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे.
धानपिकालाच शेतकऱ्यांची पसंती
- मुबलक पाऊस आणि सिंचनाची सुविधा असल्याने परंपरागत धानपिकालाच जिल्ह्यातील शेतकरी पसंती देताना दिसत आहेत. वर्षानुवर्ष धानाची शेती केली जात आहे. त्यामुळे नवीन पीकपद्धतीत फायदा होईल की नाही याची खात्री नसते. धानाबाबत खात्री असल्याने शेतकरी काहीही झाले तरी धान पिकवतो. नगदी पिकापेक्षा धानपीकच शेतकऱ्यांना महत्त्वाचे ठरते.
प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याची गरज
- जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पन्न घेतले जाते. तांदूळ निर्मिती हा प्रमुख घटक असला तरी धानापासून इतरही खाद्यपदार्थ तयार करता येतात. त्यासाठी प्रक्रिया उद्योगाची गरज आहे. जिल्ह्यात केवळ राइस मिल असून, तेथे धानापासून तांदूळ तयार केले जातात. परंतु पोहे, मुरमुरे व इतर खाद्यपदार्थ तयार करण्याचे उद्योग येथे सुरू झाल्यास शेतकऱ्यांना धानशेतीतून दोन पैसे उरण्याची शक्यता आहे.